Join us

'माझा आवडता कलाकार' म्हणत सचिन पिळगावकरांनी केलं कौतुक, अभिनेता भारावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 3:14 PM

सचिन पिळगावकर पत्नी सुप्रियासोबत नुकतेच एक नाटक पाहायला गेले होते.

महागुरु अभिनेते सचिन पिळगावकर नुकतेच पत्नी सुप्रियासोबत 'काळी राणी' हे मराठी नाटक पाहण्यासाठी गेले होते. रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री मनवा नाईक आणि अभिनेता हरीश दुधाडे यांची महत्वाची भूमिका आहे. नाटकानंतर सचिन पिळगावकर यांनी कलाकारांचे भरभरुन कौतुक केले. यावेळी हरीष माझा आवडता कलाकार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हे ऐकून हरीषचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अभिनेते सचिन पिळगावकर कलाकारांचं कौतुक करताना म्हणाले, 'रत्नाकर मतकरींचं दर्जेदार लेखन आणि मित्र विजय केंकरेंचं अनुभवी दिग्दर्शन बघायला मिळालं. गिरीश ओकने अप्रतिम भूमिका निभावली आहे. तो इतका सुंदर गातो हे पहिल्यांदाच कळलं. त्याने गात राहिलं पाहिजे. मनवाने फारसं नाटकात काम केलेलं नाही तरी तिची स्टेजवरची पकड कौतुकास्पद होती. माझा आवडता कलाकार हरीष दुधाडे याचा अप्रतिम अभिनय बघून मला अजिबातच आश्चर्य वाटलेलं नाही. गिरीशसारख्या मातब्बर कलाकाराला टक्कर देणं तसं सोपं नाही.'

गिरीश ओक म्हणाले,'आपल्या नाटकाला ज्यांनी हजेरी लावावी असं वाटतं त्यापेकी एक म्हणजे सचिनजी आणइ सुप्रियाजी. दोघंही आज माझ्या नाटकाला आले. त्यांना नाटक खूप आवडलं याचा आनंद होतोय. सचिनजींचा उर्दूचा अभ्यास आहे. मला नाटकात दोन शेर हवे होते त्यासाठी मी त्यांना विनंती केली. त्यांनी लगेच मला दोन शेर लिहून पाठवले होते. त्यांच्यासमोर त्यांनीच दिलेले शेर नाटकात सादर करताना  काय मजा आली राव, बास अजून काय पाहिजे.'

हरिष दुधाडेनेही पोस्ट शेअर करत सचिन पिळगांवकर यांचे आभार मानले.त्याने लिहिले,'कालचा दिवस एक अविस्मरणीय दिवस ठरला ... कारण "काळीराणी" या आमच्या नाटकाच्या प्रयोगाला सचिन पिळगावकरजी आणि सुप्रीया पिळगावकरजी जोडीने हजर होते . मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला ज्यांनी स्वताःच्या कलेनी भुरळ घातली अशा दोन मातब्बर कलाकारांसमोर आम्हाला आमची कला सादर करायची संधी मिळाली आणि काय हवं...सचिनजींनी जी प्रतिक्रीया दिली ती खूप मोठी शाब्बासकी आहे ...हा दिवस स्मरणात राहिल..

हरिषने 'पावनखिंड' सिनेमात बहिरजी नाईकांची भूमिका साकारली होती. तसेच त्याने अनेक मालिकांमध्येही भूमिका साकारली आहे. 'खुलता कळी खुलेना' ही त्याची मालिका प्रचंड गाजली होती.

टॅग्स :सचिन पिळगांवकरमराठी अभिनेता