अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सचिन यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे 'अशी ही बनवाबनवी', 'आत्मविश्वास', 'नवरा माझा नवसाचा', 'गंमत जंमत' असे सिनेमे आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सचिन पिळगावकर नुकत्यात सुरु झालेल्या 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या तिसऱ्या पर्वामध्ये परीक्षकांची जबाबदारी सांभाळत आहेत. अशातच सचिन पिळगावकरांनी शोच्याआधी वडाळा विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर त्यांना आलेला खास अनुभव त्यांनी सांगितला.
सचिन पिळगावकरांना मंदिरात भेटली आजी अन्...
सचिन पिळगावकरांना वडाळा विठ्ठल मंदिरात एक आजी भेटली. त्या आजीने अगदी लहान मुलाप्रमाणे सचिन यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून कौतुक केलं. सचिन हा व्हिडीओ शेअर करत लिहितात, "माझं लहानपण वडाळ्याला गेलंय. माझे आईचे वडील आणि आई म्हणजे आजी आजोबा वडाळ्याला राहायचे. वडाळा येथील सहकार नगरमध्ये ते राहत असत. मी लहानपणी आजी आजोबांकडे जायचो. लाडू खायचो. आजोबा मला छान गोष्टी सांगायचे. त्या सहकार नगरमध्ये एक बाई होत्या. त्या बाईंमध्ये मला कायम ममत्व दिसायचं. त्या बाईंची भेट आज या मंदिरात सुद्धा झाली. योगायोग म्हणा किंवा विठ्ठलाची कृपा म्हणा. त्यांचा आशीर्वाद पुन्हा एकदा मला लाभला."
सचिन पिळगावकरांचं वर्कफ्रंट
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या दोन्ही पर्वांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले ४ ते १४ या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. या पर्वातही जजच्या भूमिकेत सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे आहेत. १३ जुलैपासून हा शो स्टार प्रवाहवर सुरु झालाय. याशिवाय सचिन यांच्या आगामी 'नवरा माझा नवसाचा २' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.