'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) या लोकप्रिय मराठी सिनेमातील 'कुणीतरी येणार येणार गं' हे गाणं आयकॉनिक ठरलं. आजही डोहाळ जेवण म्हणलं की हे गाणं वाजतंच. 1988 साली आलेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. यातील डायलॉग्स तर आजही प्रत्येकाला पाठ असतील. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सिद्धार्थ रे या सर्व कलाकरांनी अगदी धमाल आणली. आजही सिनेमाची तितकीच आठवण काढली जाते.
नुकतंच सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, अश्विनी भावे हे सर्व एकाच मंचावर आले होते. तेव्हा या चोघांनी पुन्हा एकदा 'कुणीतरी येणार येणार गं...' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी अशोक सराफ मात्र यावेळी मंचावर नव्हते. तब्बल ३६ वर्षांनी या कलाकारांनी 'कुणीतरी येणार गं...' वर डान्स करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांच्या डान्सवर प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. निवेदिता सराफ यांच्या फॅन पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो तुफान व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तसंच ज्यांनी या सर्व कलाकारांना प्रत्यक्षात स्टेजवर पाहिलं त्यांना तर हे खास सरप्राईजच मिळालं. 'अशी ही बनवाबनवी' हा खरं तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा सिनेमा. या सिनेमाचा विषय निघाला की लक्ष्याची आठवण येणार नाही असं तर होऊच शकत नाही. सचिन पिळगांवकर यांनीच सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं.
'धनंजय माने इथेच राहतात का?','तुमचे ७० रुपये वारले हो','लिंबू कलरची साडी', माझा पार्वती' हे डायलॉग आयकॉनिक ठरले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सचिन पिळगांवकर यांना या सिनेमाच्या सीक्वेलविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी लक्ष्याशिवाय सिनेमाचा सीक्वेल बनूच शकत नाही असं उत्तर देत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.