म्युझिकल ‘माझा एल्गार’ मांडणार संघर्षाची गाथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 18:43 IST
मनोरंजनाचं सर्वात लोकप्रिय माध्यम असलेल्या सिनेमांनाही सामाजिक संदेशाची जोड देत आशयघन कलाकृती निर्माण करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांची फार मोठी परंपरा भारतीय ...
म्युझिकल ‘माझा एल्गार’ मांडणार संघर्षाची गाथा
मनोरंजनाचं सर्वात लोकप्रिय माध्यम असलेल्या सिनेमांनाही सामाजिक संदेशाची जोड देत आशयघन कलाकृती निर्माण करणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांची फार मोठी परंपरा भारतीय चित्रपटसृष्टीला लाभली आहे. आजच्या पिढीतील काही निर्माते-दिग्दर्शकही याच वाटेने जात मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांची अचूक सांगड घालीत चित्रपट निर्मिती करीत आहेत. ‘माझा एल्गार’ हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी एका हृदयस्पर्शी कथानकाला गीत-संगीताची किनार जोडत ‘माझा एल्गार’ हा चित्रपट बनवला आहे.येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सद्गुरु फिल्मची प्रस्तुती असलेल्या निर्माते सौरभ आपटे आणि प्रस्तुतकर्ते श्रीकांत आपटे यांच्या ‘माझा एल्गार’ या चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञांच्या टिमने हजेरी लावली. कथानकाला गती प्रदान करणाऱ्या वेगवेगळ्या मूडमधील चार गीतांचा या चित्रपटात समावेष करण्यात आला आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं आहे. यापैकी ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं...’ या भक्तीरसाने भरलेल्या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वर दिला आहे, तर सौरभ शेटे आणि आनंदी जोशी यांनी ‘थांब ना... अजून क्षणभर थांब ना...’ हे प्रणयगीत गायलं आहे. हिरमुसलेल्या मनाला उभारी देणाऱ्या ‘अन्याय तुडवण्यासाठी...’ या स्फूतीर्गीतामध्ये सौरभ शेटेने जीव ओतला असून, अवधूत गुप्तेने ‘आयना का बायना...’ हे मस्तीपूर्ण धम्माल गीत आपल्या अनोख्या शैलीत सजीव केलं आहे. सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीने या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. ‘माझा एल्गार’ हा चित्रपट केवळ एक कलाकृती नसून, एक सामाजिक संदेश असल्याचं मानत निर्माते सौरभ आपटे म्हणाले की, आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. सिनेमा हे मनोरंजंनाचं माध्यम असलं, तरी त्याद्वारे सामाजिक प्रश्न मांडणंही आवश्यक असल्याचं ते म्हणाले. एक सकस कथानक सुमधूर गीत-संगीताच्या आधारे सादर करण्याचा प्रयत्न आमच्या टिमने केला असल्याने यातील गीते आणि एकूणच चित्रपटही प्रेक्षकांना भावेल असा विश्वास सौरभ आपटे यांनी व्यक्त केला.दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच या चित्रपटाची कथा लिहीली आहे, तर पटकथा-संवाद चेतन किंजळकर यांचे आहेत. ऐश्वर्या राजेश, स्वप्निल राजशेखर, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गांधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन आदि कलाकारांच्या भूमिका असलेला ‘माझा एल्गार’ १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. उमेश पोफळे यांनी छायांकन केलं असून, नकुल प्रसाद- प्रज्योत पावसकर यांनी संकलन केलं आहे. प्राण हंबरडे यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली आहे. जितेंद्र जैस्वार या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. वेशभूषा अरविंद गौड यांनी केली असून, भरत प्रजापती व आरती यांनी कलाकारांना रंगभूषा केली आहे.