सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सईचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्यामुळे आपल्या या आवडत्या अभिनेत्रीच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता सईच्या चाहत्यांना नेहमीच असते आणि सईदेखील सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. त्यामुळे इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सईने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये एक हार्ट देखील पोस्ट केला आहे.
सई या फोटोत एका मुलासोबत दिसत असून तिच्या चेहऱ्यावर खूपच छान हास्य पाहायला मिळत आहे. तिने या फोटोत जीन्स, पांढरा टिशर्ट आणि त्यावर पिवळ्या रंगाचा श्रग घातला असून ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत तिच्यासोबत दिसणाऱ्या तरुणाचे नाव घनश्याम लालसा असून तो देखील एक अभिनेता आहे. त्याने हायर, हंसा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या फोटोच्या खाली सई आणि घनश्याम यांच्यातील संवाद वाचून तर तिच्या फॅन्सना डाल में कुछ काला है असेच वाटू लागले आहे. या फोटोखालील कमेंटमध्ये मला महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे असल्याने ही पोस्ट केली असल्याचे घनश्यामने मस्तीत म्हटले आहे तर तू आजही प्रसिद्ध असल्याचे सईच्या फॅन्सनी त्याला प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे.
सई आणि घनश्याम नात्यात असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून मीडियात रंगल्या आहेत. सई आणि घनश्याम अनेक वेळा सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करतात. सई आणि घनश्याम खरंच नात्यात आहेत की नाही हे केवळ सई आणि घनश्यामच सांगू शकतात. पण या दोघांनीही या चर्चांवर मौन राखणेच पसंत केले आहे.