Join us

सई ताम्हणकरने पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात केले श्रमदान,पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 10:26 AM

पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त ...

पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.यंदा सुकळवाडीत गेलेल्या सईला श्रमदान केल्यानंतरच्या अनुभवाविषयी विचारल्यावर ती म्हणते, “दरवेळी श्रमदानात स्वेच्छेने सहभागी होणा-या कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय. आणि महाराष्ट्राच्या मातीची नव्या पिढीला ओढ लागतेय, हे पाहून मला खूप छान वाटतंय. इथे कुटूंबच्या कुटूंब येऊन श्रमदान करताना मी पाहते आहे. त्यातल्या एका शहरी कुटूंबप्रमुखाने श्रमदानावेळी मला सांगितलं, की, मी शेतक-याचा मुलगा असल्याने श्रमदानाचं महत्व मला आहे. पण माझ्या मुलीला पाणी कुठून येतं विचाराल तर ती सांगेल की नळातून. हे ऐकायला तात्पूरतं मजेशीर वाटलं तरीही हे भयाण सत्य आहे. त्यामूळेच आपल्या मातीची ओढ लागावी. म्हणून मी तिला श्रमदानासाठी घेऊन आलोय”.सई पूढे म्हणते, “ही प्रतिक्रियाच सांगते, की आजचे पालक आपल्या मुलांना पून्हा एकदा मातीची ओढ लावू पाहता आहेत. आणि हे जर श्रमदानाने शक्य होत असेल, तर पाणी फाऊंडेशन नक्कीच यशस्वी ठरतेय असं मला वाटतं.” ती पूढे सांगते, “1 मेच्या दिवशीच लग्न असलेलं एक जोडपं श्रमदानाला आलं होतं.त्याचप्रमाणे मी यावेळी अगदी सात वर्षांच्या लहानग्यांना आणि सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांनाही धडाडीने कुदळ फावडे हातात घेऊन काम करताना पाहिलं आणि श्रमदान करण्याचा हुरूप अजूनच वाढला. एक आगळं समाधान घेऊन मी त्या गावातून परत आली आहे.”महाराष्ट्रातील दुष्काळविरोधात महाराष्ट्रदिनी तुफान येणार आहे.सेलिब्रेटी महाश्रमदान करण्याबरोबरच लोकांना सहभागी करून घेणार आहेत.यासाठी अभिनेते जितेंद्र जोशीने पुढाकार घेतला आहे.आमिर खानच्या पुढाकारातून पाणी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याच्या मार्फत जलसंधारणाच्या कामातून दुष्काळविरोधात लढा देणाऱ्या गावांसाठी वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार या चळवळीत सहभागी झाले असून गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच स्वतःही श्रमदान करत आहेत.