मराठी सिनेइंडस्ट्रीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. इतकेच नाही तर यंदाच्या आयफा अवॉर्डसह फिल्मफेअर अवॉर्डवरही तिने नाव कोरले आहे. मिमी या हिंदी सिनेमासाठी तिला पुरस्कार मिळाला. पण ऑफर आलेल्या पहिल्या सिनेमातून तिला काढून टाकण्यात आले होते. तू चकणी आहेस असं कारण सांगून सईला नकार देण्यात आला होता. बस बाई बस (Bas Bai Bas) या शोमध्ये तिने हा उलगडा केला आहे.
बस बाई बसमधील बसमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सुबोध भावे याच्यासोबत तिच्या कारकीर्दीचा प्रवास उलगडला. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या कलाकारांना त्यांच्या संघर्षकाळातील हे दिवस विसरणं शक्यच नसतं. यंदाच्या आयफा अवॉर्ड आणि फिल्म फेअर अवॉर्डवर नाव कोरणाऱ्या मराठमोळ्या सई ताम्हणकरला ऑफर केलेल्या पहिल्या सिनेमातून शूटिंग सुरू होण्याआधीच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
सई ताम्हणकरला सिनेमातून काढताना जे कारण त्या निर्मात्यांनी सांगितले ते ऐकून तिला खूप वाईट वाटले होते. सई ताम्हणकर जेव्हा सांगलीहून मुंबईत अभिनय करण्यासाठी गेली तेव्हा तिने भूमिका मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल केला. तिच्या पहिल्या सिनेमाची आठवण आजही तिच्या मनावर कोरली आहे. बस बाई बस या शोमध्ये जेव्हा सुबोधने तिच्या पहिल्या सिनेमाविषयी विचारले तेव्हा सई म्हणाली, मला पहिला सिनेमा मिळाला तेव्हा मला खूप आनंद झाला. मला ऑफर देण्यात आली. सगळे ठरले. शूटिंगच्या तारखा मला पाठवण्यात आल्या. शूटिंग सुरू होणार त्याच्या आदल्या दिवशी मला निरोप आला की मी त्या सिनेमात काम करणार नाहीये. मला धक्का बसला. पण जेव्हा मी कारण विचारले तेव्हा मला सांगण्यात आले की मी डोळ्याने चकणी आहे.
सईने हा किस्सा बस बाई बस शोमध्ये सांगितला आणि ती स्वत:च हसायला लागली. सुबोध म्हणाला की त्याला चिकनी म्हणायचे असेल पण तो चुकून चकणी म्हणाला असेल. यावरही बस बाई बस शोच्या सेटवर हशा पिकला. सई म्हणाली कदाचित तो चकणा असेल त्यामुळे मी त्याला त्याच्यासारखीच दिसले असेन. माझ्या हातून पहिला सिनेमा तर गेला पण तो पहिला अनुभव मला खूप काही शिकवून गेला. मी त्यानंतर इतकी जिद्दी बनले की माझ्या दिसण्यापेक्षा माझ्यातील अभिनयाच्या जोरावर मला ऑफर मिळाल्या पाहिजेत असा मी निर्धारच केला. सई ताम्हणकर हिच्या आयुष्यातील हा किस्सा ऐकून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.