Join us

"त्याचा तिरकसपणा आधी मला आवडायचा नाही पण...", प्रसाद ओकबद्दल सईचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:31 IST

"आमच्यात जे काही गैरसमज होते ते...:" प्रसाद ओकनेही दिलं उत्तर

सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले आणि ईशा डे यांचा 'गुलकंद' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये समीर-सई आणि प्रसाद-ईशा अशा आगळ्यावेगळ्या जोड्या आहेत. सिनेमाचं टीझर, यातली गाणी तर सर्वांना खूप आवडली आहेत. तसंच याची कथा नक्की काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतंच प्रसाद (Prasad Oak) आणि सईने (Saie Tamhankar) काल गुढीपाडव्यानिमित्त गिरगांवच्या शोभायात्रेत हजेरी लावली. तेव्हा त्यांनी एकमेकांचा बाँड नक्की कसा आहे ते सांगितलं.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, "खरं सांगायचं तर आमच्यात जे काही गैरसमज होते ते हास्यजत्रेमुळेच दूर झालेत. आम्ही काही एकमेकांना रोज फोन करत नाही. पण रात्री २ वाजताही गरज पडली तर एकमेकांसाठी धावून येणारे आहोत. त्यामुळे आमच्यात न सांगता येणारा असा एक बाँड नक्कीच तयार झाला आहे जे खूप अनपेक्षित होतं. त्यांचा तिरकसपणा मला आधी आवडायचा नाही पण आता तोच स्वॅग वाटायला लागला आहे. असे खूप बदल झाले आहेत. त्यांच्यामुळे माझ्या भाषेतही खूप फरक पडला आहे. त्यामुळे मी हजार गोष्टींसाठी त्यांना श्रेय देईन. एवढं मात्र नक्की सांगेन की त्या खुर्चीत हे नसतील तर मला करमत नाही."

प्रसाद ओक म्हणाला, "माझा सगळ्यात पहिला सिनेमा 'हाय काय'ची अभिनेत्री सई होती. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. पण ती म्हणते ते खरं आहे आमच्यात हास्यजत्रेमुळेच एक बाँड तयार झाला. आम्ही महिन्यातून सात-आठ वेळा सेटवर भेटायला लागलो. खूप गप्पा मारायला लागलो. गप्पांमधून माणूस उलगडत जातो. त्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दलचे गैरसमज दूर झाले. माझ्या मनात तिच्याबद्दल काही गैरसमज नव्हतेच. त्यामुळे दूर व्हायचा प्रश्नच नव्हता. ती खूप उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत वारंवार काम करण्याची संधी मिळावी. माझ्या दिग्दर्शनाच्या प्रोजेक्टमध्ये ती काम करेल अशा संधीचीही मी वाट पाहत आहे."

टॅग्स :सई ताम्हणकरमराठी अभिनेताप्रसाद ओक महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी चित्रपट