Join us  

गर्लफ्रेंडची जात वेगळी म्हणून आईने दिला नकार, 'सैराट' फेम अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 1:38 PM

गर्लफ्रेंडची जात समजल्यावर आई आणि माझ्यात भांडणं... तानाजीने सांगितला संपूर्ण प्रसंग

'सैराट' या नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या सिनेमात छोट्याशा गावातील मुलं भूमिकेत झळकली होती. रिंकु, आकाश, तानाजी हे सर्व मुख्य भूमिकेतले कलाकार पहिल्यांदाच अभिनय करत होते. तरी हा सिनेमा मराठीतला सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला. सिनेमाने 70 कोटी कमावले. सिनेमातील 'लंगड्या' म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता तानाजी गालगुंडेही (Tanaji Galgunde) नंतर लोकप्रिय झाला. त्याचा 'ए परश्या, आर्ची आली रे आर्ची...' हा डायलॉग चांगलाच गाजला. तानाजीने नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्याने लग्न, प्रेम, जात या विषयावर त्याचे विचार मांडले.

तानाजीचा लग्न या संस्थेवर विश्वास नाही असं तो म्हणतो. त्याला लिव्ह इन रिलेशनशिप पटतं. तसंच एकदा त्याच्या आईने गर्लफ्रेंडची जात पाहून तिला नकार दिला होता याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "माझी गर्लफ्रेंड वेगळ्या जातीची आहे. मी जातपात मानत नाही. मी फार पुढे गेलो आहे. ५-६ वर्षांपासून पुण्यात आम्ही दोघं राहत होतो. मी माझ्या घरी काही सांगितलंच नाही कारण त्यांची विचारधारा तशी नव्हती. त्यांना न पटणारंच होतं. पण माझी गर्लफ्रेंड माझ्या मागे लागली होती की तुझ्या घरी सांग आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. मी तिला म्हणलं अगं ते कधीच ऐकणार नाहीत, आपण राहू असंच चांगलं नंतर बघू कधी मुलं झाल्यावर घेऊन जाऊ तेव्हा. पण ती काही ऐकत नव्हती. म्हणून मी तिला म्हणलं मी नाही बोलत तूच बोल."

तो पुढे म्हणाला,"माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यावर आई पुण्याला येऊन राहिली होती. तेव्हा माझी गर्लफ्रेंड मध्ये मध्ये घरी यायची. तिचं आणि आईचं चांगलं जमलं होतं. आई तिला ओळखायची कारण आमचं गाव एकच होतं. तिच्या आईची आणि माझ्या आईची ओळख होती. एक दिवस गर्लफ्रेंडने माझ्या आईला आमच्याबद्दल सांगितलं. मी दुरुनच बघत होतो. त्यांच्यात बोलणं झाल्यानंतर गर्लफ्रेंड माझ्याकडे आली. मी विचारलं काय झालं? तर ती म्हणाली, विरोध आहे त्यांचा. मी तिला म्हणलं की मी बोललोच होतो ते ऐकणार नाहीत."

"गर्लफ्रेंड गेल्यावर माझ्या आईने माझ्यावर खूप राग राग केला. यासाठीच तुला इथं पाठवलं का वगरे अशा गोष्टी बोलायला तिने सुरुवात केली. आमचं भांडणच झालं. आईला गर्लफ्रेंडच्या जातीचा प्रॉब्लेम होता. दुसरी कोणीही आण कोणत्याही जातीची आण पण ही नको असं ती मला म्हणाली. कारण काय तर गावात सगळ्यांना तिची जात माहित होती. "

टॅग्स :मराठी अभिनेतालग्नसेलिब्रिटीपरिवार