तुमचा आमचा लाडका परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसरचा आज वाढदिवस.परश्या आता परश्या राहिलेला नाही तर मोठ्ठा स्टार झाला आहे. परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटातून रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. आकाशचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
‘सैराट’ काय मिळाला आणि आकाशचं नशीब एका रात्रीत बदललं.परशा उर्फ आकाश ठोसरचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी आकाश पैलवान होता. त्याला कुस्ती खेळायला खूप आवडायची.पण त्याने आपलं नशिब आजमवण्यासाठी कुस्ती करता-करता अभिनयासाठी एक ऑडीशन दिला.
आकाशने पुण्याच्या एस पी एम मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुणे विद्यापिठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या नाटकात तो अभिनय करायचा. तेव्हापासून त्याने अभिनयात करिअर करायचे ठरवले म्हणून त्याने एका ऑडीशनसाठी हजेरी लावली. तेव्हा मात्र या पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तेही सहाय्यक कलाकार म्हणून नाही तर मुख्य अभिनेता म्हणून झाले.
हा चित्रपट होता दिग्दर्शक नागराज मंजूळे लिखीत सैराट. सैराट चित्रपटामुळे आकाशला लोकप्रियता मिळाली. गेल्या काही दिवसांपासून आकाशचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून तो नवनवीन अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.