‘सैराट’ चित्रपट आठवला की सर्वप्रथम आठवतात ते आर्ची आणि परश्या. पाठोपाठ आठवतात ते नागराज मंजुळे ( Nagraj Manjule). होय, ‘सैराट’ या चित्रपटाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला सैराट करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘सैराट’ या चित्रपटानंतर नागराज अण्णांना अमाप लोकप्रियता मिळाली. याच नागराज अण्णांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
नागराज मंजुळे यांनी आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. शालेय शिक्षणानंतर वाईट मित्रांची संगत लागली. त्यातून ते व्यसनांच्या आहारी गेले. पण एकाक्षणी सगळं मागे सोडून त्यांनी पुन्हा शिक्षणाची कास धरली. या काळात वाचनाचा, कविता लेखनाचा छंद जडला. हा छंद आजही ते जोपासतात. नागराज एक उत्तम दिग्दर्शक आहेत, तितकेच उत्तम कवी आहेत. कविता हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लवकरच ‘रिकामटेकड्याचे आत्मवृत्त’ हा कविता संग्रह ते घेऊन येत आहेत. पण हा कविता संग्रह त्यांचा नाही तर त्यांचा मित्र संग्राम बापू हजारे या मित्राचा आहे. याबद्दल त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. नागराज मंजुळे पोस्ट-
कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.एखादी चांगली कविता वाचली की खूप समृद्ध झाल्यागत वाटतं.काही वर्षांपूर्वी विक्रांतच्या तोंडून संग्रामच्या कविता ऐकल्याआणि भारावून गेलो.नंतर कळलं की संग्रामनं एकही कविता कधी कुठं प्रकाशित केली नाही. अलुफ ,आत्ममग्न संग्रामनं त्याची कविता मित्रांच्या मैफिलीबाहेर कुठं जाऊच दिली नाही. संग्रामनं जणू आपल्याच गाळलेल्या जागा भरल्या आहेत.ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागतच आणखी एक जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला आहे हे जाणून जरासं दुकटं वाटलं...संग्रामच्या कविता मला प्रचंड आवडल्या.वाटलं ह्या कवितांची अनुभूती आनंद सगळ्यांना घेता यावाम्हणूनच आटपाटच्या माध्यमातून ‘रिकामटेकड्याचे आत्मवृत्त’ हा संग्राम बापू हजारे या मित्राचा पहिला संग्रह प्रकाशित करतोय...आशा आहे तुम्हाला आवडेल.भेटू सांगलीत....27 आॅगस्ट संध्याकाळी 4 वाजताविष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली...., अशी पोस्ट नागराज यांनी शेअर केली आहे. नागराज मंजुळे त्यांनी नाळ, फॅन्ड्रीसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच त्यांनी अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.