समाजातील वास्तवाचं अचूकपणे चित्रण करत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. पिस्तुल्या, फ्रँडी, सैराट, झुंड अशा कितीतरी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आरसा दाखवला. त्यामुळे नागराज मंजुळे हे नाव मराठीसह हिंदीमध्येही गाजलं आहे. एकाहून एक सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नागराज यांचा मराठी कलाविश्वात दबदबा आहे. मात्र, या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी बराच स्ट्रगल केला आहे.
नागराज यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला. तसंच त्यांच्या घरच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. यावेळी बोलत असताना एकेकाळी त्यांनी चक्क सिक्युरिटी गार्डचं काम केल्याचंही त्यांनी सांगितलं. नागराज यांच्या घरची परिस्थिती तशी हालाखीची होती. त्यामुळे घरात कोणी फारसं शिकलं नाही. त्यातल्या त्यात नागराज यांनी कसंबसं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, शिक्षण घेत असतानाच त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीदेखील केली.
आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा
सुरक्षारक्षक म्हणून केलं काम
शालेय शिक्षण झाल्यानंतर नागराज यांना काही मित्रांची वाईट संगत लागली होती. ज्यामुळे ते व्यसनांच्या आहारी गेले होते. मात्र, या सगळ्यातून बाहेर पडत त्यांनी पुन्हा एकदा नव्याने शिक्षणास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना त्यांना पुस्तक वाचन आणि कविता लेखन यांचा छंद जडला. यातून त्यांच्या मनात चित्रपट निर्मितीचा विचार येऊ लागला.
आर्चीच्या वडिलांची रिअल लाइफ बायको कधी पाहिलीये का? कलाविश्वाशी जराही नाही संबंध
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे याची जाणीव झाल्यानंतर ते झपाटून अभ्यास करु लागले. मात्र, शिक्षणासाठी पैश्यांची कमतरता भासू लागली. ज्यामुळे ते दिवसा लोकांचे कपडे इस्त्री करुन देत होते. तर, रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे.
दरम्यान, नागराज यांनी जेऊरमध्ये त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तर, पुढील शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठातून घेतलं. मात्र, शिक्षणाचा किडा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे त्यांनी नगरमध्ये मास कम्युनिकेशनचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. हा कोर्स करत असताना प्रोजेक्टचा भाग म्हणून त्यांनी पिस्तुल्या हा पहिला लघुपट तयार केला. विशेष म्हणजे या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि, येथूनच त्यांच्या फिल्मी करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.