कोरोनाच्या संकटकाळात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मदत केली. सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार असे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी धावले. अभिनेता सोनू सूदने तर हजारो स्थलांतरित मजूरांना मदतीचा हात देत त्यांना आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवले. या बड्या सेलिब्रिटींच्या मदतीची चर्चा झाली. पण काही असे आहेत, ज्यांचे काम आत्ताकुठे लोकांपुढे येतेय. यापैकीच एक म्हणजे, ‘सैराट’ मधील सल्या अर्थात अरबाज शेख.
होय, कोरोना आणि लॉकडाऊन या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना वेगवेगळ्या संकटातून जावे लागले. सल्या अर्थात अरबाज लोकांच्या या वेदना पाहून कळवळला आणि त्याने त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. वी विल वीन या सेवाभावी संस्थेच्या मदतीने अरबाज त्याच्या गावातील गरजूंना अन्नधान्य वाटप करत आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने आपल्या या कार्याबद्दल सांगितले. त्याने सांगितले, ‘लॉकडाऊन काळातील लोकांचे दु:ख, त्यांच्या अडचणी बघवत नव्हत्या. आधी वाटले होते, ही मदत काय आपण सहज करू. पण लोकांना प्रत्यक्ष मदत करायला गेल्यावर वेगळाच अनुभव होता. मदत मिळाल्यानंतर हात जोडणारे चेहरे बघून आतून कसेतरी होते. मदतकार्य करून घरी आल्यावर जेव्हा तुमच्यासमोर जेवणाचे ताट असते तेव्हा हे चेहरे डोळ्यांपुढे येतात. खरं सांगतो घास पोटात जात नाही.’
कशी केली सल्याने सुरुवात सोलापूर जिल्ह्यासाठी सचिन अतकरेंनी या कार्याला सुरुवात केली होती. फेसबुकमार्फत अरबाज व सचिनची ओळख झाली. लॉकडाउन सुरू झाल्यापासून सचिन गरजूंना अन्नधान्य वाटप करत होता. त्याला अरबाजने साथ दिली. अरबाज अगदी गावातील प्रत्येक घरात जाऊन त्यांच्याकडे रेशनकार्ड आहे का याची खात्री करून घेतो. दिवसाला ५०- ६० घरं फिरून त्यातील अतीगरजू लोकांची यादी तयार करतो. यानंतर धान्याचे किट तयार करण्यासाठी दुकानात जाऊन आवश्यक वस्तूंची यादी देतो. स्वत: सर्व गोष्टी योग्य पद्धतीने होत आहेत की नाही याची खात्री झाल्यानंतर इतरांवर काम न सोपवतो तो स्वत: गरजूंच्या घरी अन्नधान्य वाटप करायला जातो.