Join us  

मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही! 'सैराट' फेम तानाजीचं रोखठोक मत, म्हणाला-"त्यापेक्षा लिव्ह इन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:34 PM

सैराट फेम तानाजी गळगुंडेने लग्नसंस्थेवर त्याचं परखड मत व्यक्त केलंय. तानाजीने केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे (tanaji galgunde)

'सैराट' मधील बाळ्याची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे तानाजी गळगुंडे. तानाजीने गेल्या काही वर्षात विविध सिनेमांमधून आणि रिअॅलिटी शोमधून काम केलंय. तानाजी निसर्गाच्या सानिध्यात रमणारा कलाकार आहे. तानाजी जाहीरपणे त्याची मतं मांडताना सहसा दिसत नाही. पण अलीकडेच आरपार या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत लग्नव्यवस्थेवर भाष्य केलंय आणि त्याचं मत मांडलंय.

तानाजी लग्नव्यवस्थेवर काय म्हणाला?

सैराट फेम तानाजीने मुलाखतीत सांगितलं की, "मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. मी कदाचित खूप पुढे गेलो असेल. मला आता फक्त Live In Relation पटतं. एकतर ते लग्नाअगोदर बघायचं. याशिवाय आपण त्या मुलीला आवडतोय का नाही, माहित नाही. मग लग्न करायचं. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं. एका दिवसासाठी एवढा मोठा अवडंबर का करायचा? एवढा मोठा तामजाम का करायचा?. ५ - १० लाख खर्च करायचा. खर्च करुन वाजत गाजत वरात काढायची. बँड बाजा लावायचा."

तानाजी पुढे म्हणतो, "एकत्र नाचणं ही चांगली गोष्ट आहे. पण एखादी छोटी पार्टी करावी असं वाटतं. मला Live In Relation ग्रेट वाटतं. लग्न करायचं तर रजिस्टर करावं असं वाटतं. हा एवढा खर्च नको. दोन-चार हजारात लग्न करा. हारतुरे घाला एकमेकांना." असं मत तानाजीने व्यक्त केलंय. तानाजीने लग्नसंस्थेवर मांडलेल्या मताची सध्या चांगलीच चर्चा आहे. तानाजीने यावर्षी 'नवरदेव B.Sc Agri' सिनेमात काम केलेलं.  

टॅग्स :सैराट 2मराठी