सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आलेली असताना राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून आपल्या मतदारसंघातील उमेदवारासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक सेलिब्रिटीही राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेले दिसत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि संगीतकार असलेले सलील कुलकर्णी यांच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक राजकीय पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय प्रचाराबाबत भाष्य केलं आहे. "एकाचा "हल्लाबोल", मग दुसरा "पलटवार" टीव्हीवर सतत ऐकू येतंय...सध्या प्रचारात कुठल्या शब्दांना अचानक महत्त्व आलंय?", असं सलील कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "भर पावसात चिंब भिजलेल्या सभा", "टोला...सणसणीत", "प्रचार शिगेला पोहोचलाय" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, राज्यात बुधवारी(२० नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आता महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? की तिसरी वेगळीच आघाडी पाहायला मिळणार? याकडे संपू्र्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.