सलील कुलकर्णी हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध गायक आणि गीतकार आहेत. काही दिवसांपूर्वीच टी २० वर्ल्डकप सुरू असताना सलील कुलकर्णींनी त्यांच्या सोशल मीडियावरुन अमेरिकेचा मराठमोळा क्रिकेटर सौरभ नेत्रवळकरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ सौरभ सलील कुलकर्णींच्या एकदा काय झालं अल्बममधील 'रे क्षणा थांब ना' हे गाणं गात होता. हा व्हिडिओ शेअर करत सलील कुलकर्णींनी सौरभचं कौतुक केलं होतं. आता चक्क सौरभबरोबर त्यांनी हे गाणं गायलं आहे.
सलील कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलील कुलकर्णी आणि सौरभ 'रे क्षणा थांब ना' हे गाणं गाताना दिसत आहेत. या व्हिडिओला त्यांनी "रे क्षणा थांब ना...(एकदा काय झालं). या सुपर टॅलेंटेड गोलंदाजाचा साधेपणाच त्याला जास्त स्पेशल बनवतो. सौरभ तुझा गर्व आहे. आम्हाला असंच प्रेरित करत राहा", असं कॅप्शन दिलं आहे. सलील कुलकर्णींच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
सौरभ हा अमेरिकन क्रिकेटपटू आहे. टी२० वर्ल्ड कपमुळे तो चर्चेत आला होता. ३२ वर्षीय सौरभ हा मुळचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ ला मुंबईत झाला. २००८-०९ मध्ये कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांत ३० बळी घेतले. त्यामुळे २०१० च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१०च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांसारख्या बड्या खेळाडूंसोबत सौरभही टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीत स्पर्धेबाहेर गेला.
सौरभला सहा सामन्यांत ९ विकेट्स घेता आल्या. २५ धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती आणि इकॉनॉमी रेटदेखील ३.११ होता. असे असूनही, सौरभला टीम इंडियात स्थान देण्यात आले नाही. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर स्पर्धांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. पण त्याला संधी मिळालीच नाही. अखेर तो अमेरिकेत निघून गेला आणि सध्या तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे. काही काळ तो अमेरिकन संघाचा कर्णधारही होता.