कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या लोकांवर तर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. सलील कुलकर्णी नुकतेच न्यूझीलंडमधून परत आले असून प्रशासकिय अधिकाऱ्यांनी त्यांची घरी जाऊन विचारपूस केली. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर सलील यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, न्यूझीलंडचा दौरा आटोपून आम्ही ११ मार्चला भारतात परत आलो. मुंबई एअरपोर्टला अतिशय वेळेत आणि योग्य पद्धतीने आमची तपासणी केली गेली ... न्यूझीलंडहून आलेल्यांची विशेष चौकशी करायची नसून सुद्धा आमची मूलभूत तपासणी केली. आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्कल ऑफिसर आणि हेल्थ ऑफिसर प्रमोद भांड आणि प्रमोद चव्हाण आत्ता घरी आले आणि अत्यंत मुद्देसूद प्रश्न विचारले. मुंबई एअरपोर्टहून परदेशातून आलेल्या प्रत्येकाचं नाव त्या त्या शहरात पाठवलं जात आहे असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तब्येतीला काहीही त्रास नाही ना? तुम्ही पुन्हा कुठेही बाहेर जाण्याची शक्यता नाही ना? अशी खातरजमा करून त्यांनी प्रेमाने काही सल्ले दिले आणि मग आम्ही फोटो काढला. माझी गाणी आवडतात म्हणून त्यांना फोटो हवा होता. पण त्यांच्या कामाचं, आपल्या व्यवस्थेचा अभिमान वाटल्यामुळे मला आज या मंडळींबरोबर फोटो हवाच होत ...हे खरे सेलिब्रिटी...याला कोणताही राजकीय रंग देण्याची माझी इच्छा नाही. पण प्रत्येकाच्या तब्येतीला धोका असलेल्या परिस्थितीत घरोघरी जाऊन फिरून चौकशी करून प्रबोधन करणारे हे सगळे मित्र, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांचं मी एक जबाबदार नागरिक म्हणून मनापासून अभिनंदन करतो!! आपण तक्रारीच्या अनेक पोस्ट्स लिहित असतो... तेव्हा जेव्हा कौतुक वाटलं तेव्हाही ते लिहायलाच हवं... आपण सगळे काळजी घेऊया आणि लवकरात लवकर ह्यातून बाहेर येऊया!! जयहिंद !! जय महाराष्ट्र !!