Join us

सलीम-सुलेमान यांचा मराठीत 'प्रवास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 07:15 IST

शशांक उदापूरकर दिग्दर्शित 'प्रवास' चित्रपटाच्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडी मराठीत पदार्पण करत आहेत.

ठळक मुद्देसलीम-सुलेमान यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण'प्रवास' चित्रपटातील गाण्यांना सलीम-सुलेमानने दिला स्वरसाज

आजवर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे. गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता मराठी चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित 'प्रवास' या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.

'चक दे इंडिया', 'अब तक छप्पन', 'दोस्ताना', 'धूम २', 'फॅशन', 'सिंग इज किंग', 'मुझसे शादी करोगी', 'आजा नचले', 'इक्बाल', 'हम तुम' यासारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटातील सलीम- सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले आहे. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत.'प्रवास' चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि  गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतंच संपन्न झाले आहे. प्रवास चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे सलीम- सुलेमान सांगतात की, आमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.ओम छंगानी फिल्म्स निर्मित 'प्रवास' या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.