Join us

सलमान खानप्रमाणेच हा मराठीतील अभिनेता देखील लग्न करण्यापासून पळतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 5:02 AM

अभिनयाच्या वेडापायी मुले, मुली घरदार सोडून मुंबईत दाखल झाले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ...

अभिनयाच्या वेडापायी मुले, मुली घरदार सोडून मुंबईत दाखल झाले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या. पण जोवर अभिनेता म्हणून नावारूपास येत नाही तोवर लग्नच करणार नाही, असे मनाशी ठरवलेला एक अभिनेता आहे... तो अभिनेता म्हणजे शरद जाधव! मराठीतला नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणून एकांकिका चळवळीत ओळखला जाणारा शरद जाधव घुमा या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारतो आहे. फोक्सवॅगनच्या जर्मन, फेसबुकच्या अमेरिकन आणि पोलंडच्या मॉलच्या जाहिरातीत झळकलेल्या शरदने काही तेलगू जाहिरातीतून काम केले आहे. शरद गेली १५ वर्षं नाटक, जाहिरात आणि सिनेमात अभिनयाच्या जोरावर मुख्य भूमिका मिळावी म्हणून धडपडतोय. परंतु छोट्या-मोठ्या भूमिकांवरच त्याला आजवर समाधान मानावे लागल्याने त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या ३४ व्या वर्षीही तो अविवाहित आहे.शरद जाधव मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा-ख़डले परमानंदचा. अभिनयाच्या वेडापायी शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात दाखल झाला. पुण्यात टेक्सास गायकवाड यांच्या प्रबुद्ध रंगभूमी संस्थेतून एकांकिका-नाटकातून कामं करू लागला. बऱ्याच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकातून त्याने छोटी-मोठी कामे केली. फोक्सवॅगन, फेसबुक यांसारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीही केल्या. परंतु स्वत:चं पोट भरण्याचीही भ्रांत झालेल्या शरद जाधवला घरातून विरोध होऊ लागला. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्याचे लग्न लावून देऊ मग तो सुधरेल, या भाबड्या आशेपायी मुली पाहायला सुरुवात केली. आता आपल्याला कुठेतरी नोकरी करावी लागणार आणि आपले ध्येय संपणार! यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शरदने घरच्यांना लग्न करेन पण अभिनेता म्हणून नावारूपास आल्यानंतरच...! असे ठणकावून सांगितले. पण आता घुमा या सिनेमात त्याला नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.आपल्या हुशार मुलाला जिल्हापरिषदेच्या शाळेतून काढून इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या एका शेतकरी बापाची म्हणजेच नामाची प्रमुख भूमिका शरद जाधव साकारतोय. या चित्रपटाची गोष्ट ही नामा या व्यक्तिरेखेभोवती फिरते. त्यामुळे शरद जाधव या चित्रपटाचा खरा हिरो आहे. आता मायबाप प्रेक्षकांच्या कृपाशिर्वादाने घुमाला घवघवीत यश मिळू दे आणि माझ्या लग्नाकडे डोळे लावून बसलेल्या माझ्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी आशा शरद जाधवने व्यक्त केली आहे.   Also Read : सामाजिक जाणिवेतून 'घुमा' या चित्रपटामध्ये शिक्षणपद्धतीवर प्रकाशझोत