Join us

रंगदेवतेला अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत...; १९६० पूर्वीच्या मराठी नाटकांची पुन्हा होणार नांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 8:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘ नाटक’ हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. मराठी रंगभूमीच्या आजवरच्या प्रवासात अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘नाटक’ हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. मराठी रंगभूमीच्या आजवरच्या प्रवासात अनेक मैलाचे दगड ठरावेत, असे नाट्याविष्कार सादर झाले आहेत. अनेक दिग्गज नाटककारांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. नाटकांचा हा दुर्मीळ ठेवा जपण्याच्या उद्देशाने शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून ‘जुन्या दर्जेदार आणि दुर्मीळ मराठी नाटकां’चे जतन केले जाणार असल्याची माहिती अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी दिली. यानिमित्त १९६० पूर्वीच्या गाजलेल्या नाट्यकृती पुनःश्च रंगभूमीवर पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 

नाटकांचा स्वप्नवत असा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात किर्लोस्कर, कृ. प्र. खाडिलकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, मो. ग. रांगणेकर, वि. वा. शिरवाडकर, विद्याधर गोखले अशा विख्यात नाटककारांनी अनेक नाट्यकृती दिल्या. याच धर्तीवर गाजलेल्या सन १९६० पूर्वीच्या नाट्यकृती पुनःश्च रंगभूमीवर सादर होणार आहेत. 

दुर्मिळांचे जतन व्हावे म्हणून...

  • दुर्मीळ नाटकांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा मराठी नाटकांचे दिग्दर्शन अथवा निर्मिती केलेल्या तसेच किमान तीन नाटकांचे चित्रीकरण केल्याचा अनुभव असणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना त्यांचे प्रस्ताव पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने १५ ऑगस्टपूर्वी मागवले आहेत. 
  • या अनुदान योजनेसाठी समिती गठित करण्यात आली असून, अकादमीच्या संकेतस्थळावर अधिक तपशील उपलब्ध आहे. दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे. 
  • योजनेमुळे मराठी रंगभूमीवरील जुनी दर्जेदार आणि दुर्मीळ नाटके रसिकांना पुन्हा पाहता येतील. तसेच जतन केल्याने भविष्यातील पिढ्यांनाही अभ्यासासाठी हा ठेवा उपयुक्त ठरेल.
टॅग्स :नाटक