Sameer Vidwans On Mhada Lottery : मुंबईसारख्या शहरामध्ये स्वत:चं घर असलं पाहिजे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. मुंबईत दिवसेंदिवस घराच्या किंमतीत वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हाडाच्या सोडतीची वाट पाहत असतो. या सोडतीसाठी सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळीही अर्ज करत असतात. कलाकार कोट्यातून अर्ज केल्यानंतर त्यांना या सेवेचा लाभ घेता येतो. दरम्यान, मराठी नाटक, टीव्ही मालिकांचे लेखन करणाऱ्या एका लेखकाने म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज केला. त्यामध्ये त्यांना घर लागले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'कलाकार प्रमाणपत्र' आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यासाठी त्या लेखकांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे 'कलाकार' प्रमाणपत्रासाठी विनंती केली. त्यावर लेखक हे कलाकार नाहीत असे उत्तर त्यांना मिळाले. या मुद्यावरून मनोरंजन विश्वात नाराजीचा सूर उमटला आहे.
यावर आता विविध माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसने आपली नाराजी व्यक्त केली आहे. समीर विद्वांसने सोशल मीडियाच्या माध्यमातून घडल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याने लिहलंय, " बरोबरंच आहे! लेखक कलाकार नाहीतच! सगळे दिग्दर्शक, अभिनेते स्वयंभू आहेत! स्टेजवर स्क्रीनवर येऊन ते बाराखडी आणि पाढेच म्हणतात लेखन ही कला थोडी आहे? किराणा मालाची यादी आणि संहिता यात काही फरक नाही! अच्छा, ते स्टेजवर भाषण देणाऱ्या नेत्यांना अधिकृत कलाकार मानायचं का आता?" अशा तिखट शब्दात त्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे.
नुकतीच म्हाडाकडून मुंबईतील गोरेगाव, अॅंटॉप हिल, वडाळा, कन्नमवार नगर- विक्रोळी तसेच शिवधाम कॉम्पलेक्स मालाड येथील गृहनिर्माण प्रकल्पातील वेगवेगळ्या उत्पन्न गटातील २ हजार ३० घरांची सोडत काढण्यात आली आहे. आजपासून म्हाडाच्या सोडतीच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यातच या अर्ज नाकारल्याच्या प्रकरणामुळे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.