संदीप कुलकर्णी यांनी आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते. 'श्वास', 'डोंबिवली फास्ट', 'गैर', 'लेडीस स्पेशल', 'सानेगुरुजी', 'दुनियादारी' यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि 'ट्रॅफिक सिग्नल', 'हजारो ख्वाईशे ऐसी', 'इस रात की सुबह नहीं' अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.
आता बहुप्रतिक्षित डोंबिवली रिटर्न सिनेमातून संदिप कुलकर्णी रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, "डोंबिवली रिटर्न" हा या निर्मिती संस्थेचा पहिला सिनेमा आहे.
संदिप कुलकर्णीने साकारलेली "डोंबिवली फास्ट" या सिनेमातील माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या सिनेमातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या सिनेमाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती घडवण्यासाठी सज्ज आहे. आशयसंपन्नेसह प्रेक्षकांना आवडतील असे सिनेमा निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार आहेत.
मी आणि माझे मित्र महेंद्र अटोले आम्ही दोघांनी मिळून "कंरबोला क्रिएशन्स" या निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यांना सिनेमांमध्ये, विशेषतः चांगल्या आशय निर्मितीमध्ये रस आहे. आम्हा दोघांची आवड सारखीच असल्यानं आम्ही दोघं एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली. आमचा पहिला सिनेमा आहे "डोंबिवली रिटर्न...".
"डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सिनेमा आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं सांगितलं असून नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येणार आहे.