'संगीत मानापमान' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा पुढील काहीच दिवसांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'संगीत मानापमान' सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. 'संगीत मानापमान' सिनेमातील गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अशातच 'संगीत मानापमान'मधील चंद्रिका हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेतोय.
संगीत मानापमानमधील चंद्रिका गाण्याची चर्चा
'चंद्रिका.. तव रूपाने या धरतीवर अवतरली.. तुला भेटता.. शतजन्मांची कोडी मजला उलगडली...', असे शब्द असलेलं हे गाणं काहीच तासांपूर्वी युट्यूबवर रिलीज झालं. सुबोध भावे-वैदेही परशुरामी यांचा कधीही न पाहिलेला रोमँटिक अंदाज सिनेमात पाहायला मिळतोय. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजातील हे रोमँटिक गाणं सध्या चर्चेत आहे. समीर सामंत यांचे हृदयस्पर्शी गीत आणि शंकर एहसान लॉय या तिकडीचे अप्रतिम संगीत यांची अनोखी जोड या गाण्याला आहे. अल्पावधीत हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
'संगीत मानापमान' काहीच दिवसात होतोय रिलीज
सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान' सिनेमा पुढील काही दिवसांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. 'संगीत मानापमान' सिनेमात सुबोध भावेसोबत वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, सुमीत राघवन हे कलाकार आहेत. 'संगीत मानापमान' सिनेमा हा संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी असणार यात शंका नाही.