Join us

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:19 PM

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. सिनेमाचा १०० % नफा हा मराठा समाजाला देणार असल्याचं टीमने जाहीर केलंय (sangharshayoddha manoj jarange patil)

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेमाची गाणी,  अभिनय, टिझर, ट्रेलर अशा अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या. अखेर १४ जूनला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चळवळ उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत होता. पण या सिनेमाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवलेली दिसतेय. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी दिसतेय. 

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. हिंदीपासून मराठीपर्यंत सर्व सिनेमांचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट सांगणाऱ्या ‘सॅकनिल्क’ या वेबसाईटकडे हा रिपोर्ट दिसतोय. पहिल्या दिवशी सिनेमाने ८ लाख रुपयांची कमाई केली. रविवारी कमाईत चांगली वाढ होऊन १६ लाख रुपयांची कमाई या सिनेमाने केली. गेल्या काही दिवसात सुद्धा पाच-सहा लाख रुपये सिनेमाने कमावले. अशाप्रकारे गेल्या सहा दिवसांत सिनेमाने ५० लाख रुपये कमावले आहेत. सिनेमाचं एकूण बजेट आणि चर्चा बघता 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाचा कमाईचा आकडा हा कमी आहे, असं सांगण्यात येतंय.

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाविषयी

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भयंकर चर्चेत असलेला आणि १४ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीमने काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची  जबाबदारी देखील निभावलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. याशिवाय अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठीमराठी अभिनेतामराठा आरक्षण