मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला 'संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर हा चित्रपट आज शुक्रवारी १४ जूनला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. संघर्षयोद्धा सिनेमाच्या सुरभी हांडे, मोहन जोशी, सागर कारंडे असे मराठीतील चेहरे दिसले होते. आता या सिनेमात आणखी दोन नव्या पात्रांची एन्ट्री झाल्याचं दिसत आहे.
नुकताच 'संघर्षयोद्धा' सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पात्रही दिसत आहे. सुरुवातीपासूनच यांच्या भूमिका कोण साकारणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. या सिनेमात छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे ,कार्तिक दोलताडे पाटील , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर अभिनेते मोहन जोशी त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. सुरभी हांडे हिने मनोज जरांगे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचा टीजर, ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. त्यांना सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास येत्या १४ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.