ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाले, अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार आणि ‘एसडीपी’ यांनी दिली.
“दीपक दोब्रीयाल यांच्या अत्यंत प्रतिभावान अशा अभिनयाने नटलेल्या आणि तेवढ्याच प्रतिभाशाली अशा नंदिता पाटकर व बालकलाकार आर्यन मेंघजी यांचा अभिनय असलेला व राज गुप्ता यांच्या तन-मन अर्पून दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झाली. आता आम्हाला या चित्रपटाच्या नामांकनाची प्रतीक्षा आहे,” असे उद्गार आरती सुभेदार यांनी काढले. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ लवकरच अत्यंत गुणी कलाकार चमुबरोबरच्या आपल्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.
“चित्रपटाची निर्मिती हा माझ्यासाठी भावनात्मक विषय आहे. ‘बाबा’ हा माझा पहिला चित्रपट असल्याने जागतिक स्तरावर झालेल्या या प्रदर्शनाचा मला खूप आनंद आहे. यापुढे आणखी यश लाभावे अशी माझी प्रार्थना आहे आणि त्याची प्रतीक्षा मला असणार आहे,” असे उद्गार दिग्दर्शक राज गुप्ता यांनी काढले आहेत. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या ’गोल्डन ग्लोब्ज’च्या नामांकनांच्या यादीत चित्रपट प्रवेश करील, अशी आमची पूर्ण खात्री आहे, असे उद्गार अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांनी काढले आहेत.