संजय जाधव दिसणार अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 5:25 AM
एकच वादा, संजय दादा म्हणजेच मराठीतला प्यार बाटनेवाला दिग्दर्शक संजय जाधव हे आगामी अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’ या ...
एकच वादा, संजय दादा म्हणजेच मराठीतला प्यार बाटनेवाला दिग्दर्शक संजय जाधव हे आगामी अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून अभिनय करणार आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, अक्षय टाकसाळे आणि विराजस कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यांशिवाय या चित्रपटात प्रतिभावान कलाकारांचा एक अख्खा चमूच काम करत आहे. अंकिता बोरा, चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे,अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यांत समावेश आहे. चेकमेट, रिंगा रिंगा, फक्त लढ म्हणा, दुनियादारी आणि प्यार वाली लव स्टोरी यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संजय जाधव ‘हॉस्टेल डेज’मध्ये अभिनय करण्याविषयी बोलले की ‘मी अभिनय करण खूप वर्षापूर्वी सोडलं. पण खर सांगायचं तर इतर अनेकांप्रमाणे मी आलो होतो या इंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठीच; पण नशिबाने असे काही वळण घेतले की मी सिनेमटोग्राफर आणि दिग्दर्शक बनलो. पण इतर कलाकारांना दिग्दर्शन करताना स्वतः अभिनय करण्याची इच्छा मागेच पडल्यासारखी झाली होती. पण एकबार जिसको इस किडेने काट लिया तो काट लिया.... मग मनातला अभिनय करण्याचा किडा काही जात नाही. त्यामुळे जेव्हा अजय नाईक माझ्याकडे हॉस्टेल डेजमधील भूमिका घेऊन आला. तेव्हा मी भूमिकेवर झडप घातली. खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाल्यासारखी वाटली. त्यामुळे मला हे काम करतानाही खूप मजा आली. संजय जाधव पुढे म्हणाले की ‘मी वसतिगृहाच्या मुख्य अधिकाऱ्याची (हॉस्टेल रेक्टर)ची भूमिका ‘हॉस्टेल डेज’मध्ये करतोय. तो थोडासा शिस्तप्रिय, थोडासा प्रेमळ आणि आपल्या कामाबद्दल खूप पॅशनेट आहे. खर सांगायचं तर माझा स्वभावही तसाच काहीसा आहे. त्यामुळे मला हि भूमिका साकारण्यासाठी खास प्रयत्न नाही करावे लागले. खरंतर फार अभिनय करावा लागलाच नाही. कारण मी जसा आहे तसाच तिथे वावरलोय. १९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते, बेला शेंडे त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीच्या गायिका प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.