संजय खापरे म्हणतोय नायक नही खलनायक हूँ मैं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2017 4:25 AM
मराठी चित्रपटसृष्टीत नायकांप्रमाणेच खलनायकांनीदेखील त्यांचा काळ चांगलाच गाजवला आहे. निळू फुले, रमेश देव यांसारख्या खलनायकांनी तर मराठी चित्रपटसृष्टीला त्यांचे ...
मराठी चित्रपटसृष्टीत नायकांप्रमाणेच खलनायकांनीदेखील त्यांचा काळ चांगलाच गाजवला आहे. निळू फुले, रमेश देव यांसारख्या खलनायकांनी तर मराठी चित्रपटसृष्टीला त्यांचे मोठे योगदान दिले आहे. त्यांनी साकारलेल्या सगळ्याच भूमिका प्रचंड गाजल्या. सध्याच्या काळात अभिनेता संजय खापरेने एक खलनायक म्हणून स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. 'फक्त लढ म्हणा', 'दगडी चाळ', 'डिस्को सन्या' या सिनेमातील त्याने रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता 'तलाव' या सिनेमात या खलनायकाची झलक आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तलाव या सिनेमाचे दिग्दर्शन जयभीम कांबळे यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'तलाव' सिनेमात संजय खापरेने एक रावडी भूमिका साकारली असून ही भूमिका सगळ्यांना आवडेल अशी त्याला खात्री आहे. या सिनेमात तो मुजोर, गर्विष्ठ आणि उन्मत्त धनंजय पाटीलची भूमिका साकारत आहे. आपल्या सभोवताली असणाऱ्या समाज कंटकांची त्याने धनंजय या भूमिकेद्वारे नेमकी प्रतिमा उभी केली आहे. त्याच्या दहशतीतून गावकऱ्यांची सुटका कशी होईल यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. यासाठी गावात असलेल्या आशापुरी देवीचा गोंधळदेखील घातला जातो. या गोंधळाचे गोंधळ मांडला... हे गीत नंदेश उमप याने गायले असून या गीताला आशिष आंबेकरने संगीत दिले आहे. या चित्रपटात अभिनेता सौरभ गोखले प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाद्वारे सौरभ गौखले आणि संजय खापरे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत तर या चित्रपटात प्रियांका राऊत हा नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रियांकाच्या रूपाने एक फ्रेश चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आहे.