Join us

अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 10:26 AM

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी सिनेकलाकारांनी राजकीय झेंडे हातात घेतले आहेत.

Sanjay Mone  On Amit Thackeray: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. अनेक नेतेमंडळी रिंगणात आहेत.  या उमेदवारांच्या प्रचारासाठी सिनेकलाकारांनी राजकीय झेंडे हातात घेतले आहेत.  ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या कलाकारांना एक सल्ला दिलाय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मतदान का करावे आणि का करू नये, याचे काही मुद्दे मांडले आहेत. 

संजय मोने यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहलं, "माझी सर्व कलाकारांना विनंती आहे, तुमचे विचार समाज ऐकतो, तुमची वाह वाह करतो. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील. आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा, तुम्ही फक्त काही क्षणांचं, त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते. तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करुन आपण परिस्थिती बदलू शकतो, या भ्रमात राहू नका. आपला आत्मसन्मान विकू नका. कारण निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हिंग लावून विचारणार नाही. (हिंग लावून विचारणं ही एक म्हण झाली. प्रत्यक्षात हिंग महाग असतो) तेव्हा यावेळी पक्ष नाही तर व्यक्तीला मतदान करा".

संजय मोने हे माहिममधील रहिवासी आहेत. अमित ठाकरे हे मनसेकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सदानंद सरवणकर मैदानात आहेत. संजय मोने यांनी मात्र अमित ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी लिहलं,  "आता माझ्या माहीम मतदार संघाबद्दल. इथे बरेच उमेदवार आहेत. त्यातले बरेच विविध पक्षांची सफर करून आले आहेत. त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का? निशाणी म्हणजे पक्ष नाही. माझ्या मतदार संघात श्री. अमित ठाकरे उमेदवार आहेत. त्यांना मत का द्यायचं?याची कारणं मला सांगावीशी वाटतात".

संजय मोने यांनी अमित ठाकरे यांना मतदान करण्याची १० कारणं दिली....

  1.  ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडीत आहेत.
  2.  त्यांचा या मतदारसंघाशी जन्मापासून संबंध आहे.
  3.  तरुण आहेत त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत, त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.
  4.  निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेव्हा समोर आलेला प्रश्न मराठी, हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे) किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे) या तीनही भाषेत आला तर त्याचा निदान अर्थ समजण्याइतकी त्यांची कुवत आहे.
  5.  त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा. श्री. स्वरराज ठाकरे) त्यांना पूर्ण अवगत आहेत
  6.  आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्याच्या आधी कुठेही त्यांच्याबद्दल सर्व सामान्य जनतेत भीती धाक दपटशा अशी भावना नाही.
  7. वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.
  8.  एका कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते की, त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.
  9.  त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.
  10.  शिवाजी पार्कला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल, तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती. तिथे यावर्षी काही हजार तरुण तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते आणि पार अकरा-बारावाजे पर्यंत निर्धास्तपणे वावरत होते.   

 

आता श्री.अमित ठाकरे यांना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करून मुद्दा सुचेना पण तरीही शोधला

  1. श्री. अमित ठाकरे अनुभवी नाहीत. पण तो आपणच त्यांना निवडून दिलं तर सहज मिळू शकेल."

 

टॅग्स :संजय मोनेमाहीमअमित ठाकरेराज ठाकरे