शिक्षण या विषयाला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक स्थितीवर प्रकाशझोत टाकणारा 'बे एके बे' हा आगामी सिनेमा लक्षवेधी ठरतो आहे. या सिनेमाविषयी चित्रपटाची संपूर्ण टीम अतिशय मार्मिकतेने संवाद साधत असून राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या भेटीस जात आहे.
'बे एके बे’चे दिग्दर्शन संचित यादव यांनी केलं असून कथा आणि पटकथा लेखनही यादव यांनीच केलं आहे. ते चित्रपटाच्या लिखाणाचा एक किस्सा सांगताना म्हणाले की, मनाचे पूर्ण समाधान होत नव्हते म्हणून तब्बल १८ वेळा पटकथेचा मसुदा तयार केला. चित्रपटाच्या प्रवासादरम्यानचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, मला चित्रपटाचे दिग्दर्शन करावयाचे नव्हते. संजय खापरे साकारत असलेली शिक्षकाची भूमिका करावयाची होती. परंतु आम्हाला अपेक्षित असणारे दिग्दर्शन करण्यास योग्य व्यक्ती सापडत नव्हती. इतका सुंदर विषय वाया जाऊ देण्यापेक्षा मीच दिग्दर्शन करावे असे ठरले. ते सांगतात, चित्रपट निर्मितीचा अनुभव गाठीशी नव्हता पण माझी पत्नी पूर्णिमा माझ्या पाठीशी उभी राहिली.
सिनेमाचे आर्थिक गणित जुळणेही तितकेच महत्त्वाचे असते. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी संचित यादव यांनी घरही गहाण ठेवले. आशयघन चित्रपट प्रेक्षकांसमोर पोचविण्याची त्यांची तळमळ त्यांच्या या कृतीतून दिसून येते. 'बे एके बे' हा चित्रपट २३०० शाळांमध्ये दाखविण्यात येणार असून सिनेमा या माध्यमाचा उत्तम उपयोग शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी केला आहे. 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार असलेल्या या सिनेमात बिनभिंतीच्या शाळेतही आयुष्याचे धडे मुले कशी गिरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.