'छावा' (chhaava movie) सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. पुढील ८ दिवसांमध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा' सिनेमात विकी कौशल (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (akshaye khanna) पाहायला मिळणार आहेत. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना (rashmika mandanna) दिसणार आहे. सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (santosh juvekar) रायाजी ही भूमिका साकारणार आहे. संतोषने 'छावा'च्या सेटवरील शूटिंगचा व्हिडीओ शेअर केलाय. यात संतोष युद्धप्रसंग शूट करण्यासाठी जबरदस्त मेहनत करताना दिसतोय.
संतोषने शेअर केले 'छावा'चे BTS क्षण
संतोष जुवेकर सध्या 'छावा' सिनेमाविषयी विविध पोस्ट शेअर करुन त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. अशातच नुकतंच संतोषने 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागील क्षण शेअर केले आहेत. या व्हिडीओत संतोष जुवेकर युद्धप्रसंगासाठी घेत असलेली कठोर मेहनत बघायला मिळतेय. याच व्हिडीओत हातात तलवार घेऊन संतोष शत्रूंशी लढण्याचा सराव करत आहे. सिनेमाची टीम संतोषची मेहनत पाहून थक्क होताना दिसतेय. अशाप्रकारे कलाकारांची पडद्यामागची मेहनत ऑन स्क्रीन कशी दिसणार, हे सिनेमा आल्यावरच कळेल.
संतोष जुवेकर 'छावा'मध्ये खास भूमिकेत
'छावा' सिनेमात संतोष जुवेकर रायाजी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. संतोषने या सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदानासोबत अभिनय केलाय. संतोष पहिल्यांदाच इतक्या बिग बजेट हिंदी सिनेमात दिसणार आहे. 'छावा'चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. सिनेमात प्रमुख कलाकारांसोबत शुभंकर एकबोटे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी हे मराठी कलाकारही दिसणार आहेत. १४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे.