'छावा' सिनेमा (chhaava movie) चांगलाच चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी 'छावा' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली आहे. महाराष्ट्रातले सर्व थिएटर्स 'छावा'निमित्त हाऊसफुल्ल आहेत. 'छावा' सिनेमातील सर्वच कलाकारांचं खूप कौतुक होतंय. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या (vicky kaushal) अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. अशातच 'छावा' सिनेमात रायाजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संतोष जुवेकरने (santosh juvekar) 'छावा'चं स्क्रीनिंग जिथे सुरु होतं त्या थिएटरला जाऊन हजेरी लावली. याशिवाय प्रेक्षकांना कळकळीचं आवाहन केलं.
'छावा'निमित्त संतोषचं प्रेक्षकांना आवाहन
'छावा' सिनेमा पाहण्यासाठी संतोष एका थिएटरमध्ये गेला होता. त्यावेळी सिनेमा संपल्यावर संतोष पुढे आला आणि त्याने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. संतोष म्हणाला की, "आज पहिलाच दिवस आहे. आज सिनेमा रिलीज झालाय. खूप छान वाटतंय की आपल्या राजांचा चित्रपट पाहायला एवढी गर्दी होतेय. चित्रपट चालावा, खूप गर्दी व्हावी यापेक्षा आपल्या राजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान सगळ्यांना समजावं, उद्याच्या पिढीलाही समजावं म्हणून हा चित्रपट आहे. धन्यवाद." अशाप्रकारे संतोषने भावना व्यक्त केली.
'छावा' सिनेमा थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. सिनेमातील प्रमुख कलाकारांसोबतच इतर मराठी कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजीची भूमिका साकारलीय. संतोषने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. संतोष आणि विकी कौशलचे एकत्र सीन पाहायला मिळत आहेत.संतोषशिवाय सिनेमात सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे कलाकारही पाहायला मिळत आहेत.