Join us

'छावा'ला मिळणारा प्रतिसाद पाहून संतोष जुवेकर म्हणाला; "एक मराठी कलाकार म्हणून..."

By ऋचा वझे | Updated: February 19, 2025 12:58 IST

संतोष जुवेकरने काल इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला.

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. संतोषने सध्या गाजत असलेल्या 'छावा'(Chhaava) सिनेमात भूमिका साकारली आहे. विकी कौशलसोबत त्याला या भव्य अशा ऐतिसाहिक सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. सिनेमात त्याने रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे. 'छावा' ला मिळत असलेलं यश पाहून संतोष भारावला आहे. मात्र यासोबतच त्याने मराठी सिनेमांसाठीही प्रेक्षकांना खास आवाहन केलं आहे. काय म्हणाला संतोष वाचा.

संतोष जुवेकर काल इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला. 'छावा'ला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. तसंच चाहत्यांशी संवाद साधला. याचवेळी मराठी सिनेमासाठी तो म्हणाला, "मित्रांनो छावा सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतोय. थिएटर फुल आहेत. खूप भारी वाटतंय. जसा हा प्रतिसाद आणि प्रेम छावा साठी देत आहात तसंच आपल्या आगामी मराठी सिनेमांसाठी द्या. त्यांनाही तुमच्या प्रेमाची गरज आहे. प्रेक्षकांची जास्त गरज आहे. मराठी चित्रपटांनाही कवेत घ्या. एक मराठी कलाकार म्हणून मराठी सिनेमाही एवढाच जोरदार आणि मोठा व्हावा अशीच माझी इच्छा आहे."

संतोष जुवेकर याआधी 'रानटी' या मराठी सिनेमात दिसला होता. वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा होता. याशिवाय संतोष 'झेंडा','मोरया' या मराठी सिनेमांसाठीही ओळखला जातो. टीव्ही मालिका ते सिनेमा असा त्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. आता 'छावा' मधून तर त्याने मोठा पल्ला गाठला आहे.  

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेता'छावा' चित्रपटविकी कौशल