Join us

संतोष कोल्हे यांच्या हिजडा या शॉक कथेने मोडला हा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 2:12 PM

व्हायरस मराठी या यूट्यूब चॅनेलवरच्या संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. मराठी मध्ये एव्हढया मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे.

गेल्या काही वर्षांपर्यंत चित्रपट, मालिका, नाटक हीच मनोरंजनाची साधनं होती. पण बदलत्या काळानुसार मनोरंजनाची साधनं देखील बदलली आहेत. आता प्रेक्षक वेबसिरिज, शॉर्ट फिल्म मोठ्या प्रमाणावर पाहू लागले आहेत. यामुळे दिग्दर्शक, निर्माते चित्रपटांइतकेच महत्त्व वेबसिरिजना, शॉर्ट फिल्म्सना देऊ लागले आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर मंडळी देखील सध्या या माध्यमामध्ये काम करत आहेत. वेबसिरिज, शॉर्ट फिल्म लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून या माध्यमाला खूप चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

व्हायरस मराठी या यूट्यूब चॅनेलवरच्या संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. मराठी मध्ये एव्हढया मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे.

मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची एक खूप छानशी गोष्ट हिजडा या शॉक कथेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 

हिजडा या शॉक कथेत अभिनेत्री छाया कदमने हिजड्याची भूमिका साकारली आहे. आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी चित्रपट, मालिकांमध्ये हिजडा रंगवला होता. पण सतत वेगळ्या भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱ्या छाया कदमने हा हिजडा खूप चांगल्या प्रकारे उभा केला आहे. अक्षय शिंपीने यात सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका साकारली आहे. ही शॉक कथा मुकेश माचकर यांनी लिहिली आहे. आजवर अनेक गाण्याचे व्हिडीओ पॉप्युलर झाल्याचे आपण पाहिले आहेत. पण ही शॉककथा जगभर पहिली गेली आहे. या व्हिडिओला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंट्स वरून ही शॉक कथा प्रेक्षकांना किती आवडली हे आपल्याला कळत आहे. या व्हिडिओला युट्युबला 48 हजार लाइक्स मिळाले असून दोन हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. हिजडा ही शॉककथा आणि त्यातील कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचे ते त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.