'बेधडक' दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 4:09 AM
संतोष मांजरेकर हे नाव मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी नवीन नाही. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या पहिल्या चित्रपटातून त्यांनी आपली दिग्दर्शकीय ...
संतोष मांजरेकर हे नाव मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी नवीन नाही. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या पहिल्या चित्रपटातून त्यांनी आपली दिग्दर्शकीय कमाल दाखवली होती. आता 'बेधडक' या चित्रपटाच्या रुपानं त्यांनी एक आव्हानात्मक कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटानंतर त्यांनी 'सुराज्य' हा अॅक्शनपॅक्ड हा चित्रपट केला होता. आता 'बेधडक' या चित्रपटातून बॉक्सिंग या खेळावर आधारित कथानक हाताळलं आहे. जवळपास दोन वर्षांच्या खंडानंतर त्यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सुराज्य हा चित्रपट केल्यानंतर मी चांगल्या संहितेच्या शोधात होतो. त्यावेळी बेधडकची पटकथा माझ्याकडे आली. आपल्याकडे स्पोर्ट्स फिल्म खूप कमी होतात. त्यात बॉक्सिंगवरचा चित्रपट जवळपास नाही... त्यामुळे लेखक गोविंद टावरे यांच्याशी चर्चा करून पटकथेत काही बदल केले. या चित्रपटाचं कथानक संवेदनशील विषयावर भाष्य करतं. त्यावेळी भरपूर अॅक्शन हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या अॅक्शनसाठी नवा अभिनेता गिरीश टावरेनं खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट करताना मला कोणत्याही प्रकारे तडजोड करायची नव्हती. निर्माता मंदार टावरे यांनी त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मला दिलं होतं असं दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी सांगितले. बेधडक हा बॉक्सिंगवरचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. उत्तम फिजिक असलेल्या नव्याgirish taware अभिनेत्याचे या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात एक दमदार आणि पुरेपूर मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल', असे निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी सांगितले. गिरीश टावरेचे अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मंगेश कांगणे, गोविंद टावरे आणि प्रवीण बांदकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदकर यांचे संगीत लाभले असून आदर्श शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.