'ही' भूमिका साकारणे हेमांगी कवीसाठी होते आव्हानात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 08:00 AM2019-02-11T08:00:00+5:302019-02-11T08:00:00+5:30
सिनेमात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, या कलाकारांच्या मनोरंजक भूमिका आहेत.
विनोदी अभिनय, कथा, रोमँटिक गाणी, डान्स नंबर्स, एका पेक्षा एक सरस कलाकार या संपूर्ण गोष्टीने परिपूर्ण ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सिनेमात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांच्या मनोरंजक भूमिका आहेत.
अभिनेत्री हेमांगी कवी हिने आतापर्यंत अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. हेमांगी कवीचा विनोदी अभिनय हा सर्वांना पोट धरुन हसायला भाग पाडतोच. या सिनेमातील हेमांगीची भूमिका, कलाकारांचे कौतुक करण्याचा तिचा विशेष गुण, दिग्दर्शकाचे प्रयत्न आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा याविषयी बरंच काही शेअर केलं आहे.
पुन्हा एकदा विनोदी सिनेमा याविषयी सांगताना हेमांगीने म्हटले की, “खरं तर हा सिनेमा खूप विनोदी आहे. मी यामध्ये ‘प्रियंका’ हे पात्रं साकारले आहे. प्रियंका म्हटलं की प्रेमळ, प्रेम, माया असे वाटते पण मी अगदी या उलट आहे. माझ्या या पात्राला थोडीशी ग्रे शेड आहे. पण ग्रे जरी असलं तरी विनोदी आहे. सिच्युएशनल कॉमेडी आहे. प्रिमिअरला आम्ही प्रेक्षकांच्या रिऍक्शन्स बघितल्या, अपेक्षित होतं त्याहून जास्त चांगल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहचल्या.”
या पात्रासाठी चॅलेंजिंग काय होतं हे सांगताना तिने म्हटले की, “आख्या फिल्ममध्ये माझे हात-पाय बांधून ठेवले आहेत आणि असं असूनही तू सिध्दार्थ आणि सौरभवर दरारा निर्माण करतेय, असं मला सांगण्यात आलं होतं. तेव्हा मला वाटलं की, हे कसं शक्य आहे की मला बांधलं गेलंय आणि दरारा मीच निर्माण करतेय. पण तिच तर खरी गंमत आहे की मला बांधलेलं असतानाही मी समोरच्यावर कसा दरारा निर्माण करते. मला डोळ्यातून व्यक्त व्हायचं होतं. तर ही भूमिका माझ्यासाठी चॅलेंजिंग होती.”
विनोदी जॉनरसाठी नवीन असलेले कलाकार संस्कृती आणि सौरभ, विनोदाचा बादशाह सिद्धार्थविषयी बोलताना तिने सांगितले की, “संस्कृती उत्तम रिऍक्टर आहे त्यामुळे तिला कुठलीही सिच्युएशन द्या ती त्याप्रमाणे उत्तम रिऍक्ट करते. मग ती कॉमेडी, गंभीर भूमिका असो किंवा रोमँटिक गाणं असो, तिला रिऍक्शन द्यायला खूप छान जमतं. संस्कृतीमुळे मला हे शिकायला मिळालं की, एका विशिष्ट ऍक्शनला छोटीशी रिऍक्शन दिली तरी लाफ्टर तयार होऊ शकतो. सौरभसोबत मी पहिल्यांदाच कॉमेडी जॉनर केला. सिनेमात त्याला खूप बोलायचं होतं आणि मला रिऍक्ट व्हायचं होतं. पण सौरभने कॉमेडी खूप छान केली जी मला खूप आवडली. ‘तू माझा सांगाती’मध्ये आम्ही एकत्र काम केलंय आणि त्यात त्याने ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली होती. आणि त्यानंतर आता हा विनोदी सिनेमा. एकंदरीत मजा आली त्याच्यासोबत काम करताना. सिध्दार्थविषयी जितकं बोलू तितकं कमी; मला इतकंच टेन्शन होतं की मी त्याची एनर्जी मॅच करु शकेल का. कारण सिध्दू खूप एनरजेटिक आहे त्यामुळे त्याची एनर्जी मॅच करणं चॅलेंजिंग होतं.”
दिग्दर्शकाच्या पहिल्या प्रयत्नाविषयी कौतुक करत हेमांगीने म्हटले की, “दिग्दर्शक म्हणून प्रदीप यांचा हा पहिला सिनेमा जरी असला तरी असिसटंट/असोशिएट दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेकांकडे काम केलंय. मी ३-४ सिनेमांत काम केलंय जिथे ते असोशिएट दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांना हे तंत्र काही नवीन नाही. पण ऍक्शन आणि कट म्हणण्याची जबाबदारी जी दिग्दर्शकावर असते ती त्यांनी खूप छान पेलली आहे. त्यांनी म्हटले होते की, “मला माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा माझ्या आई-वडीलांसाठी, मुलांसाठी करायचाय. माझ्या वडिलांनी पहिला सिनेमा केला तो हसवणारा केला. प्रेक्षकांना मी हसवलं असा सिनेमा मला करायचाय.” पहिला प्रयत्न असूनही त्यांचं काम उत्तम आणि कमालीचं झालं आहे. महेश मांजरेकरांना ऍक्शन आणि कट म्हणणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि ती त्याने खूप छान पार पाडली. सिनेमा करताना मजा आली.”
“दोन-अडीच तास प्रेक्षकांचे छान मनोरंजन होईल. छान रोमँटिक गाणी आहेत, नाचू शकता असे डान्स नंबर आहेत. फॅमिलीसोबत जाऊन दोन- अडीच तास सिच्युएशन मध्ये अडकून सिनेमात लोकांची कशी फजिती होते आणि ते सीन्स आपल्याला कसे हसायला भाग पाडतात आणि विनोदी सिनेमाची मजा घेण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की पाहावा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’”, असे हेमांगीने म्हटले.