मराठीसोबतच हिंदीमध्ये आपल्या अप्रतिम दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. समीर हे लवकरच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रेब्रुवरी महिन्यात त्याचा साखरपुडा पार पडला होता. आता त्याच्या घरी लगीनघाई सुरू आहे. मराठी कलाकारांनी नुकतंच समीर यांचं केळवण केलं. याचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.
अभिनेता हेमंत ढोमे, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, नेहा मांडलेकर, लोकेश गुप्ते या कलाकारांनी समीर आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या केळवणाचा घाट घातला. समीर यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव जुईली सोनलकर असं आहे. सोशल मीडियावर केळवणाचे फोटो जुईलीने शेअर केले आहेत. फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'सुंदर थाळी सजवण्यात आली, स्वादिष्ट असे पदार्थ बनवले, भेटवस्तूही मिळाल्या, उखाणे घेतले गेले. या अत्यंत प्रेमळ लोकांनी आमचं केळवण साजरं करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. माझं तुमच्या प्रत्येकावर खूप प्रेम आहे. आमची रात्र खूप खास बनवण्यासाठी तुमचे खूप आभार. तुम्ही सर्वचं जण खूप भारी आहात'. जुईलीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
समीर आणि जुईली यांचा साखरपुडा फ्रेब्रुवरी महिन्यात व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर पार पडला होता. जुईली आणि समीर यांनी २०१७ मध्ये 'मला काही प्रॉब्लेम नाही' या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटांच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दिग्दर्शक असण्याबरोबरच समीर एक अभिनेता आणि उत्तम लेखकही आहे. अनेक मराठी सिनेमांचं त्याने लेखन केलं आहे. तर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'व्हाय झेड', 'धुरळा', 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'आनंदी गोपाळ' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची दिग्दर्शनाची बाजू सांभाळत त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.