सयाजी शिंदे हे मराठी, हिंदी आणि साऊथ मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. सयाजी शिंदे यांनी बहुभाषिक सिनेमांमध्ये काम करुन प्रेक्षकांंचं मनोरंजन केलंय. सयाजी शिंदे यांच्याबद्दल आज सकाळी एक बातमी कळली त्यामुळे त्यांच्या सर्व चाहत्यांना त्यांच्याबद्दल काळजी वाटली. सयाजी यांना साताऱ्यातील रुग्णालयात हृदयावरची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले अशी ती बातमी होती. आता स्वतः सयाजी यांनी रुग्णालयात दाखल करण्याचं खरं कारण सर्वांना सांगितलंय.
सयाजी शिंदे यांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत सयाजी म्हणतात, "नमस्कार! माझे हितचिंतक, रसिक प्रेक्षक. यांच्या सगळ्यांना मला खुप शुभेच्छा असतात. सगळ्यांना एकच सांगायचंय मला माझी तब्येत चांगली आहे. खबरदारी म्हणून तपासणी करुन घेतली. त्यात एक ब्लॉकेज आढळलं. पण ते सहज निघालं. म्हणजे पुढे कधीतरी अटॅक येऊ शकला असता. अशी परिस्थिती होती."
सयाजी पुढे सांगतात, "पण आता पुढे काही होणार नाही. दहा वर्ष मी अजून चांगलं काम करणार आहे. आपल्या सेवेत पुन्हा असेल मी. इन्स्टाग्रामला असेल, यूट्यूबला असेन. तर सगळं करु. कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. म्हणजे सगळ्याच बातम्या खोट्या नाहीत. पण मी आनंदी आहे, मजेत आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद." अशी पोस्ट लिहून सयाजी शिंदेंनी सर्वांचे आभार मानले आहेत.