शेतकरी आंदोलनावर सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले रोखठोक मत, म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 06:58 PM2020-12-23T18:58:37+5:302020-12-23T19:02:10+5:30
देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांचे रोखठोक मत व्यक्त केले आहे.
देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांचे रोखठोक मत व्यक्त केले आहे. सयाजी शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत त्यांचे हे मत व्यक्त केले आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटातील एक संवाद म्हणत शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
सयाजी शिंदे यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवडचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याच संवादादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सध्याच्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत विचारण्यातआले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत दाक्षिणात्य चित्रपटातील एक संवाद म्हणत आपले रोखठोक मत व्यक्त केले. देशातील शेतकरी मागे गेला तर देश देखील मागे जातो असे ते म्हणाले. सयाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मत व्यक्त करताना सांगितले की, शेतकरी मागे गेला तर देश मागे जातो आणि शेतकरी पुढे गेला म्हणजेच शेतकऱ्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती पाहाता आपला देश मागे चालला आहे असेच म्हणावे लागेल. आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहाणे अत्यंत गरजेचे आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असताना कृषीविषयक विधेयके आणि नंतर त्याचे कायद्यात रुपांतर करताना देशभरातील शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य शेतकरी यांना विश्वासात घेण्यात आले नाही, याबाबत शेतकऱ्यांना प्रमुख आक्षेप आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ही विधेयके ज्या पद्धतीने मांडण्यात आणि मंजूर करण्यात आली, त्यातील घिसाडघाई आक्षेपार्ह आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांनी चर्चेऐवजी घातलेला गोंधळ सरकारच्या पथ्यावर पडला, असाही सूर व्यक्त होत आहे.