Sayaji Shinde: पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन (Vishwa Marathi Sammelan) पार पडलं. हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. काल संमेलनाच्या समारोप समारंभाला सयाजी शिंदेंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह आदी दिग्गज उपस्थित होते. यावेळी सयाजी शिंदे यांनी भाषणादरम्यान साऊथ आफ्रिकेच्या एअरपोर्टवरील भाषणाचा किस्सा सांगितला.
भाषणादरम्यान सयाजी शिंदे म्हणाले, "मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा आनंद आहे. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने जगातील मराठी लेखक, वाचक आणि कलाकार एकत्र आलेत, हे पाहून चांगलं वाटलं. पुस्तकांमुळे आयुष्य घडत असतं, माझ आयुष्य दोन पुस्तकांमुळे घडलं. लोकांना काही विचार सांगावेत, एवढं मोठं मी स्व:ताला मानत नाही. त्यामुळे जास्त मी काही सांगणार नाही. फक्त साऊथ आफ्रिकेतील अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो".
सयाजी शिंदे चित्रपटाच्या निमित्तानं साऊथ आफ्रिकेला गेले होते. तेव्हा एअरपोर्टवर त्यांचं एका पोलिस अधिकाऱ्यांसोबत भांडण झालं होते. यावेळी तो अधिकारी इंग्रजी भाषेतून बोलत होता, तर सयाजी शिंदे हे आपल्या मराठी भाषेतून त्याला बोलत होते. याबद्दल ते म्हणाले, एकदा मी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो. एअरपोर्टवर आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. यावेळी काही पोलिस अधिकारी आले आणि त्यांनी अटिट्यूड दाखवत मला पासपोर्टबद्दल विचारलं. मग मी आमचं दोघांचं भांडणं झालं. भांडताना तो इंग्रजीत तर मी मराठीत आवाज वाढवत होतो. त्यानं नीट विचारलं असतं तर मी पासपोर्ट दाखवला असता".
तसेच सयाजी यांनी त्यांच्या आईसोबतचा एक किस्सा सांगितला. आईला जगात एकच मराठी भाषा आहे, असं वाटतं, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "आम्ही एकदा गोवा एअरपोर्टवर होतो. तेव्हा विमानाला उशीर झाला होता, तर ती विमानतळावर फेरफटका मारत होती. तर तिनं एका माणसाशी तिनं थेट मराठीत संवाद साधला. तो तेलगू की तामिळ होता. तो तिला काहीच बोलला नाही. तर तिला तो बहिरा आहे असं वाटलं. म्हणजे माझ्या आईला जगात एकच भाषा ती म्हणजे मराठी आहे असं वाटतं. याचा मला खूप आनंद होतो".