‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण १५ चित्रपटांची वर्णी लागली आणि महत्वाचे म्हणजे भारतीय चित्रपटांच्या उन्नतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या ‘विंग्स टू बॉलिवूड’ तर्फे त्यातील तब्बल १३ चित्रपट पाठविण्यात आले आहेत, ज्यात सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला ‘फास’ या चित्रपटाचादेखील समावेश आहे. चित्रपटाच्या प्रीमियरवेळी ‘फास’चे ‘डायरेक्ट स्क्रीनिंग’ ‘कान’मधून होणार होते व त्या सोहळ्यासाठी ‘विंग्स टू बॉलिवूड’ चे प्रमुख विक्रांत मोरे यांच्यातर्फे खास व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते.
अविनाश कोलते दिग्दर्शित ‘फास’ या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये, आपल्या दमदार अभिनयाने विविध पुरस्कार पटकावणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच कमलेश सावंत याने पिचलेल्या आणि हताश शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. ‘फास’ मधून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील तफावत अधोरेखित करण्यात आली असून शेतकऱ्यांचे वास्तविक प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळले गेले आहेत. दिग्दर्शक अविनाश कोलते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती आहे. लेखिका माहेश्वरी पाटील यांनी स्वानुभवावरून आणि वास्तविक घटनांवर आधारित कथानक लिहिले असून त्याचे हृदयद्रावक चित्रण झाले आहे.