68th National Film Awards : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदाही ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या मराठी चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्कारवर या चित्रपटाने आपलं नाव कोरलं. ‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवला (Sayali Sanjeev ) अश्रू अनावर झालेत. याक्षणी बाबा हवे होते, असं ती म्हणाली.‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात सायली संजीवनं मुख्य भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती भावुक झालेली दिसतेय.
या क्षणी ते हवे होते...काय बोलावं, हे याक्षणी सुचत नाहीये. माझ्या डोळ्यांत अश्रू आहेत. या सिनेमासाठी मी फार मेहनत घेतली होती. निश्चितपणे सिनेमाच्या या यशाचं श्रेय दिग्दर्शकाचं आहे. 6-7 वर्ष दिग्दर्शक शंतनू या सिनेमासाठी मेहनत घेत होते. माझ्या आयुष्यातील हा सर्वात जवळचा सिनेमा आहे आणि आज या सिनेमाला इतका मोठा पुरस्कार मिळतोय याचा मला आनंद आहे. मला याक्षणी माझ्या बाबांची आठवण होते आहे. या क्षणी ते हवे होते, असं म्हणत सायलीला अश्रू अनावर झालेत.
गतवर्षी 30 नोव्हेंबरला सायली संजीवच्या वडिलांचं निधन झालं होतं. सायली नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बाबांच्या आठवणींना उजाळा देताना दिसते. अभिनेत्री सायली संजीव झी मराठीवरील ‘काही दिया परदेस’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर सायलीनं अनेक सिनेमात काम केलं. मन फकिरा, झिम्मा सारख्या सिनेमात सायलीने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. याच काळात सायलीनं ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सिनेमा केला होता आणि आज त्याच सिनेमासाठी सायलीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमात सायलीसह अभिनेता शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, सुव्रत जोशी, अदिती द्रविड, मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.