Join us

गणेश आचार्य म्हणतायेत आई माझे सर्वस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 12:30 PM

‘स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. आई या सिनेमाच्या कथेचा गाभा असून सिनेमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद ...

‘स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. आई या सिनेमाच्या कथेचा गाभा असून सिनेमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणा-या गणेश आचार्य यांनी या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने गणेश आचार्य यांच्याशी साधलेला हा खास संवाद.हिंदीत आपण  दिग्दर्शिन केले आहे. मात्र 'भिकारी' हा सिनेमा हिंदीत न करता मराठीत करण्याचं आणि मराठी सिनेमातही दिग्दर्शक या नव्या इनिंगची सुरुवात करण्यामागे काही खास कारण ?हा सिनेमा मराठीतच का आणला असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. तर याचं कारण म्हणजे माझी आई मराठी आहे. त्यामुळेच मला हा सिनेमा मराठीतच आणायचा होता. या सिनेमाची सगळी पार्श्वभूमी आई-मुलाच्या नात्यावर बेतलेली आहे. सिनेमाचा सगळा फोकस हा आईवर आहे. त्यातच सगळ्या कुटुंबासह हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता. स्वप्नील आणि माझ्या आईला विश्वास आहे की हा सिनेमा नक्कीच रसिकांची मनं जिंकणार. त्यात रसिकांचं भरभरुन मिळणारं प्रेम यामुळे हा सिनेमा नक्कीच चांगली कामगिरी करेल. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हा सिनेमा आता रुपेरी पडद्यावर झळकला आहे. सगळ्यांचे आशीर्वाद सिनेमाला मिळाले आहेत. माझ्या आईसाठी तर हा एक अभिमानस्पद क्षण आहे. सिनेमाचं शीर्षकावरुनच तो रसिकांसाठी चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे. मात्र आपल्या नजरेतून जाणून घ्यायला आवडेल की काय आहे हा सिनेमा ?भिकारी या सिनेमाच्या शीर्षकाबरोबर त्याची टॅगलाईन आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, या एका ओळीवर संपूर्ण सिनेमाच्या कथेचे सार आहे. या सिनेमाचा नायक म्हणजेच स्वप्नील जोशी तो लंडनला राहत असतो. तिथून तो आपल्या आईसाठी भारतात परत येतो. मात्र त्याचवेळी त्याच्या आयुष्यात अशी काही घटना घडते की त्याचं सारं आयुष्य पालटतं. त्याच्या आईला एक अपघात होतो. या अपघातामुळे त्याच्या जीवनात मोठं वादळ येतं. मात्र आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी एका मुलाने जे करायला हवं ते सारं काही करण्यासाठी तो तयार असतो. मात्र त्याही पुढे जाऊन आपल्या आईसाठी भिकारी बनण्याची वेळ त्याच्यावर येते. तो भिकारी का आणि कशासाठी बनतो या सगळ्या गोष्टी रसिकांना या सिनेमात पाहायला मिळतील.कोणत्याही मुलासाठी आईचं स्थान अढळ असतं.तुम्हा दोघांमधील प्रेमळ नात्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?माझ्यासाठी माझी आईच सर्वस्व आहे. माझा जीव की प्राण सारं सारं काही माझी आईच आहे. आज जीवनात मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळेच आहे. तिचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे माझी ओळख आहे. तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही. त्यामुळेच माझ्या दिवसाचीही सुरुवात माझ्या आईच्या पाया पडून होते. तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक माणसं भेटतात. मात्र आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तिच्या इतकं खरं कोणीच नाही.  सिनेमाचा विषय वेगळा आहे आणि मराठीत पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न. त्यामुळे रिलीजआधी काय दडपण होतं का ?हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा रिलीज होण्याआधी कुण्याही दिग्दर्शकाच्या पोटात गोळा येणं, दडपण असणं स्वाभाविक आहे. तसंच दडपण माझ्यावरही होतं. मात्र आईला घेऊन मी प्रिमीअरला गेलो. आईने सिनेमा पाहिला आणि मला आशीर्वाद दिला. खरं सांगायचं तर त्या क्षणापासून माझ्या मनावर जे दडपण होतं ते एका क्षणात दूर झालं. आईचा आशीर्वाद मिळाला मग आयुष्यात आणखी काय हवं. आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर रसिकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. रसिकांना सिनेमा आवडतोय. हे सगळं माझ्या आईच्या आशीर्वादामुळेच आहे असं मी मानतो.  पहिल्या मराठी सिनेमाच्या रिलीजआधी आईने दडपण घालवलं. मात्र कोरियोग्राफरपासून हिंदी सिनेमाचं दिग्दर्शक बनताना काय दडपण आलेलं का ?माझ्या दिग्दर्शनाच्या करियरची सुरुवात स्वामी नावाच्या हिंदी सिनेमापासून झाली होती. या सिनेमात अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या भूमिका होत्या. स्वामीच्या जीवनावर आधारित हा एक सिनेमा होता. माझ्यासाठी सिनेमाचं दिग्दर्शन ही गोष्ट पूर्णपणे नवीन होती. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्याआधी मनावर खूप दडपण होतं. कारण स्वामी हा एक आर्ट सिनेमा होता. त्यामुळे सिनेमाचा विषय रसिकांना आवडेल का नाही याची मनात साशंकता होती. मात्र त्याचवेळी माझी आई माझ्यासाठी धावून आली. तिने माझा हुरुप वाढवला. आपण एका वडापाववर दिवस काढले आहेत. आयुष्यात आजवर कधीही हार मानली नाही असं सांगत तिने मला प्रोत्साहन दिलं. बस तिचे शब्द ऐकून सारं दडपण निघून गेलं. आज गणेश आचार्य जो कुणी आहे, जी माझी ओळख आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आईमुळेच आहे. आईने फक्त प्रोत्साहनच दिलं नाही तर यश मिळाल्यानंतरही जमिनीवर कसं राहायचं हे शिकवलं. आईपासून जी काही शक्ती मिळते तीच सतत काम करत राहण्याचं नवं बळ आणि उत्साह देते. मेहनत आणि जिद्दीला जेव्हा आईच्या आशीर्वादाची साथ मिळते तेव्हा कोणतंही काम व्यर्थ जात नाही.     बालपणापासूनच तुमच्यावर मोठी जबाबदारी आली?तुमच्या या खडतर प्रवासाविषयी काय सांगाल ?अगदी कमी लहान वयात मी काम करायला सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी माझे वडिल गेले. तेराव्या वर्षापासून मी कामाला सुरुवात केली. डान्स ग्रुप सुरु केला. सुरुवातीपासून जे काही करायचं ते पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने करायचं हे ठरवलं. त्यानुसार प्रामाणिकपणे माझं काम करत गेलो. वयाच्या 19व्या वर्षी कोरियोग्राफर बनलो आणि 21 व्या वर्षी अनाम या पहिल्या सिनेमासाठी कोरियोग्राफ केलं. मात्र हे सगळं करताना माझ्या आईचे आशीर्वाद माझ्यासोबत होते. तिच्या आशीर्वादानं प्रत्येक गोष्ट करत गेलो. पहिल्या सिनेमानंतर मागे वळून पाहिलं नाही. जमिनीवर पाय ठेवून काम करत गेलो. विविध सिनेमांची गाणी कोरियोग्राफ केली. काही सिनेमात अभिनेता म्हणून कामही केलं आणि आता दिग्दर्शनाची नवी इनिंगही एन्जॉय करत आहे.   या सिनेमासाठी हिरो म्हणून स्वप्नील जोशीची निवड करण्यामागे काही खास कारण होतं का ?  या सिनेमासाठी मला एक खास चेहरा होता. असा एक चेहरा हवा होता की जो चेह-यानेही श्रीमंत दिसेन. त्यातच मी स्वप्नील जोशीचे दुनियादारी म्हणा किंवा आधीचे बरेच सिनेमा पाहिले होते. त्यामुळे सुरुवातीपासून माझ्यासाठी तो श्रीमंत चेहरा म्हणून फक्त आणि फक्त स्वप्नीलचे नावच होते असं मी प्रामाणिकपणे सांगेन. तोच या भूमिकेला न्याय देऊ शकेन असा मला विश्वास होता. श्रीमंत मुलापासून ते भिकारी इथपर्यंतच्या सगळ्या छटा त्याने सिनेमात मोठ्या खुबीने साकारल्या आहेत. प्रचंड कौशल्य असलेला हरहुन्नरी असा एक कलाकार तो आहे असं मी मानतो. भूमिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेतो. माझ्यासाठी तो माझा लहान भाऊच आहे असं मी मानतो.   सिनेमाच्या कथेसोबत त्याची गाणीही गाजतायत तर त्याविषयी काय जाणून घ्याल ?  सिनेमाच्या कथेसोबतच या सिनेमाची आणखी एक खास बात सांगायची तर ते संगीत आहे असं मला वाटतं. कारण सिनेमाची गाणी सध्या रसिकांच्या ओठावर रुळली आहेत. ही गाणी सध्या हिट होत आहेत. बाळा बाळा हे गाणं सोडलं तर बाकी सगळी गाणी बॅकग्राऊंड स्कोर आहे. यात एक गणपतीचंही गाणं आहे. या सिनेमाच्या कथेला जेवढी आवश्यक गाणी आणि डान्स आवश्यक होता, तेवढ्याच गोष्टी या सिनेमात ठेवण्याचा प्रयत्न होता.  सिनेमा रिलीज झाला आहे तर रसिकांनी हा सिनेमा का थिएटरला जाऊन का पाहावा ? सिनेमाच्या प्रिमीअरला 900 पैकी 400 लोक अमराठी होते. त्यांनाही सिनेमाचा विषय, कथा, कलाकारांचा अभिनय आवडला. त्यांनीही सिनेमाचं कौतुक केलं. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाच्या हृद्याच्या जवळचा विषय म्हणजेच आईचा विषय असल्याने रसिकांनी हा सिनेमा पाहावा असं मला वाटतं.