प्रिया बापटने आजवर काकस्पर्श, हॅपी जर्नी, आम्ही दोघी, वजनदार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. प्रिया बापटने चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांमध्ये देखील तिच्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. तिने मराठी प्रमाणेच लगे रहो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटात देखील ती काम करणार होती. या चित्रपटात ती एका हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसणार होती. पण काही कारणास्तव तिला या चित्रपटाचा भाग होता आले नाही.
चक दे इंडिया या चित्रपटात प्रियाने का काम केले नाही याविषयी तिने नुकतेच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ती सांगते, ''मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये भूमिका साकारल्यानंतर मला कितीतरी हिंदी फिल्म्सच्या ऑफर्स येत होत्या. मला चक दे इंडिया या चित्रपटाची देखील ऑफर आली होती. पण ग्रॅज्युएशनचे वर्षं असल्याने मी चक दे इंडियाला नकार दिला. त्या काळात माझ्यासाठी माझा अभ्यास जास्त महत्त्वाचा होता. मला माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण करायचं होतं. अखेर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं. चक दे ही खरंच मोठी ऑफर होती. तो चित्रपट स्वीकारणं म्हणजे शाहरुख खानबरोबर तीन महिने काम करण्याची संधी मिळाली असती. पण मी कसलाही विचार न करता, एकाच फटक्यात नाही म्हणून टाकलं. या चित्रपटासाठी तीन महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार होतं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तीन महिने शूटिंग होणार होतं. ग्रॅज्युएशनचे वर्षं असल्याने तितका वेळ देणे माझ्यासाठी शक्य नव्हतं. ''
शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटाला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी देखील चांगलीच पसंती दर्शवली होती. या चित्रपटाला आणि चित्रपटातील कलाकारांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.