Join us

सीड बॉल्स सिनेमाचा मुहूर्त संपन्न, या कलाकारांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 10:17 PM

हा सिनेमा हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये सादर होणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला नाशिक, कोकण, वडगाव या ठिकाणी येत्या डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. आणि २०१९ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी ऑक्सिजन खूप महत्वाचा असतो. आणि त्याचा खरा आणि शुद्ध स्त्रोत म्हणजे झाडं. ती आजूबाजूला असतील तर आपण स्वच्छ, ताजा श्वास घेऊ शकतो. त्यासाठी झाडं वाचवणे, त्यांची काळजी घेणे, जंगल वाचवणे. असाच विचार मांडण्यासाठी अखिल देसाई दिग्दर्शित “सीड बॉल्स” नावाचा एक नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन जोमाने या सिनेमाच्या शूटला सुरुवात करणार आहोत, असे दिग्दर्शक अखिल देसाई यांनी या वेळी सांगितले. या मुहूर्ताच्या वेळी सिनेमातील सायली गावंकर, रुद्र ढोरे, प्रशांत नगरे हे मुख्य कलाकार तर सोबत या सिनेमाचे निर्माते सुरेश ढोरे, दिग्दर्शक अखिल देसाई उपस्थित होते.

या सिनेमाच्या मुहूर्तानंतर सिनेमाच्या टीमने दादरमधील कमला मेहता अंध विद्यालयाला भेट देऊन त्यांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत वेळ घालवला. या सिनेमाविषयी सांगताना अखिल देसाई यांनी सांगितले की, “एका गावामध्ये जंगल वाचवण्यासाठी एका मुलीने तिच्या मित्रांसोबत मिळून केलेला संघर्ष आणि ती ते जंगल कशापद्धतीने वाचवते, याबद्दल ची गोष्ट आहे. हा सिनेमा हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये सादर होणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला नाशिक, कोकण, वडगाव या ठिकाणी येत्या डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. आणि २०१९ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

“झाड, जंगल यांची खरी गरज ओळखून ती वाचावीत यासाठी प्रयत्न करणं आपणा सर्वांचीच जबाबदारी असल्याने आणि तोच मेसेज या सिनेमात मांडण्याची मला संधी मिळतीय याचा मला आनंद आहे,” असे या सिनेमातील मुख्य कलाकार सायली गावकर हिने सांगितले. तर रुद्र ढोरे याने सांगितले की, “हा सिनेमा हिंदी आणि इंग्लिशमध्ये असल्याने सध्या अखिल सर आमची हिंदी भाषेचा सराव करून घेत आहेत. शिवाय सिनेमाचा विषय चांगला आहे तर आणि हिंदी पहिल्यांदा करत असल्याने मी खूप उत्सुक आहे.”