Join us

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी 'एक होतं पाणी'चे केले तोंडभरून कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 8:00 AM

'एक होतं पाणी' चित्रपटाच्या टीमने सध्या राळेगणसिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली आणि पाणी या विषयावर गहन चर्चा देखील केली.

 व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी'सारखा वास्तवाची जाणीव करून देणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या टीमने सध्या राळेगणसिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली आणि पाणी या विषयावर गहन चर्चा देखील केली.

पाण्यासाठी महायुद्ध होण्याची वेळ आली असून पाणी मुबलक असेल तर आणि तरच गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा म्हणजे राज्य आणि देशाचा विकास होऊ शकतो असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी मांडले. शिवाय त्यांनी या चर्चेत पुढे असेही म्हटले की आजची परिस्थिती भयानक झाली आहे. एवढे उच्च शिक्षित मंत्री व अधिकारी असतांना पाण्याच्या नियोजनाचा अभाव दिसून येतो. वैयक्तिक सुखाच्या मागे माणूस लागल्याने पर्यायाने गावाचा विकास खुंटतो आहे. एक होता राजा,एक होती राणी तसे एक होते पाणी असे म्हणण्याची खरेच वेळ येऊ नये. आज आमच्या गावात राळेगणसिद्धीमध्ये पाण्याची कमतरता नाही आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्यावर सगळे मिळून एकजुटीने काम करतो आहे. गावोगावी पाण्याअभावी टँकर सुरू झाले आहेत पण आम्ही बाहेरच्या गावांना टँकर देतो. पाणी वाचवण्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे पण सरकारला मात्र केवळ मते हवी आहेत. त्यामुळे ते कायदा करायला घाबरतात. प्रत्येक गावाने एकत्र येत  पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज झाली आहे. इतक्या महत्वाच्या विषयावर सिनेमा बनवल्याबद्दल तुमचे कौतुक आहे. त्यात हा सिनेमा नगर जिल्ह्यात चित्रीत झाला आहे व सिनेमात त्यामुळे दाखविण्यात आलेली टँकरची परिस्थिती या ठिकाणी वास्तव अशी आहे तर मराठवाडा व विदर्भात काय असेल? याचा अंदाज येतो.  त्यातून लोकांनी काहीतरी बोध घ्यायला हवा. अनेक चित्रपट मनोरंजन करतात तर काही सिनेमे फक्त मनोरंजन नाही तर काळजात घर करून राहतात. त्यापैकी पाण्याच्या गहन विषयावर हा सिनेमा आहे. 

पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिली आहे त्याचे उत्तम उदाहरण देतो. अशा वास्तव व गंभीर विषयावर लेखन केल्याने या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मनापासून कौतुक केले व अशा ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, बालकलाकार चैत्रा भुजबळ,गणेश मयेकर,दिपज्योती नाईक,रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे,आशिष निनगुरकर, डॉ.राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, वर्षा पाटणकर,अनुराधा भावसार,कांचन दोडे व संदीप पाटील आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटातील गाण्यांना संगीत विकास जोशी यांनी दिले असून ऋषिकेश रानडे,आनंदी जोशी,रोहीत राऊत,मृण्मयी दडके-पाटील व विकास जोशी यांनी या गाण्यांना स्वरसाज दिला आहे.या सिनेमाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे,सिद्धेश दळवी,सुनील जाधव व स्वप्नील निंबाळकर यांनी काम केले आहे.हा चित्रपट १० मे पासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :एक होतं पाणी