2008 साली दे धक्का चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव आणि मेधा मांजरेकर अशा दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या या विनोदी चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल येत असून, त्याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. नवीन वर्षात 1 जानेवारी, 2022मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दे धक्कामध्ये सायली आणि किसनाची भूमिका साकारणारे बालकलाकार सीक्वलमध्ये दिसणार आहे का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र हे बालकलाकार सीक्वलमध्ये दिसणार का, हे अजून गुलदस्त्यात आहे. आता हे बालकलाकार मोठे झाले असून त्यांना ओळखणं कठीण झाले आहे.
दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारली आहे. सध्या ती अभिनय क्षेत्रात सक्रीय नाही. आता ती 26 वर्षांची झाली असून तिने मुंबईतील माटुंगा येथील ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली आहे. २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ या रियालिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत भाग घेतला होता. २०१५ साली तिने आवाहन चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.
किसनाची भूमिका अभिनेता सक्षम कुलकर्णीने साकारली आहे. त्याने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्याने दे धक्का, पक पकपकाक आणि शिक्षणाच्या आयचा घो या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्याचे हे काम प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. याशिवाय त्याने फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, घंटा, झिपऱ्या आणि भाई-व्यक्ती आणि वल्ली या चित्रपटात काम केले आहे. आंबट गोड आणि लव्ह, लग्न लोचा या मालिकेत तो झळकला आहे.
गौरी वैद्य आणि सक्षम कुलकर्णी दे धक्काच्या सीक्वलमध्ये दिसणार का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.