...लवकरच येणार ‘माहेरची साडी’चा सीक्वल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2017 4:28 PM
आजही मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मिती करण्याचा विचार केला जात आहे. ९०च्या दशकात ...
आजही मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाºया ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मिती करण्याचा विचार केला जात आहे. ९०च्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. ज्या काळात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची प्रतीक्षा असायची त्याकाळात या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला एक वेगळाच लौकिक मिळवून दिला होता. विशेषत: महिला रसिकांना या चित्रपटाने आपलेसे केले होते. आता पुन्हा एकदा असाच काहीसा इमोशनल ड्रामा पडद्यावर रंगविण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. १९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मिती केली जाणार आहे. तब्बल २६ वर्षानंतर दिग्दर्शक विजय कोंडके हे या चित्रपटाच्या दुसºया भागाच्या निर्मितीवर काम करीत आहेत. चित्रपटाची पटकथा तयार असून, कलाकार व तंत्रज्ञ यांची निवड करताच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. विजय कोंडके हे दिवंगत अभिनेता दादा कोंडके यांचे पुतणे असून, या चित्रपटातून त्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाप्रमाणेच त्याच्या सीक्वललाही प्रेक्षकांची पसंती मिळेल, असे त्यांना वाटत आहे. ‘माहेरची साडी’ या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी अतिशय दमदार अशी भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांनी ‘सोशिक सून’ साकारली होती. या चित्रपटाने अलका कुबल यांना रातोरात स्टारचा दर्जा मिळवून दिला होता. शिवाय त्यांना एक वेगळीच ओळखही मिळवून दिली होती. चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’ हे गाणे त्यावेळी प्रचंड हिट झाले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. अलका कुबल यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दरम्यान, एका वृत्तपत्राशी बोलताना विजय कोंडके यांनी म्हटले की, सध्या मी या चित्रपटाच्या कथेवर काम करीत असून, हे काम पूर्ण होताच, कलाकारांची निवड केली जाणार आहे. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या अखेरीस अलका कुबलचे निधन झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र तिच्या मुलीचे काय होते, याच अनुषंंगाने कथा पुढे दाखविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटातील कलाकारांविषयी त्यांनी अद्यापपर्यंत खुलासा केला नाही.