Join us  

सातवे आखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 15 ते 17 फेब्रुवारीला रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 10:22 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाण आणि वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे सातवे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाण आणि वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे सातवे आखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज आपल्या निवासस्थानी दिली.संत चोखामेळा नगरीत आयोजित संत साहित्य संमेलनात राज्यामध्ये अमूल्य कार्य केल्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येईल. तुकडोजी महाराजांचे सचिव जनार्दन बोथे सदर पुरस्कार स्विकारतील. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी संत गाडगे महाराज मिशनला जीवन गौरव  पुरस्कार देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यात आणि राज्याबाहेर वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचाराचे विशेष कार्य केल्याबाबत ह.भ.प. बाबामहाराज राशनकर यांनाही पुरस्कार देण्यात येईल. तसेच अंधश्रध्दा बुवाबाजी विरोधात तसेच व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणारे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना संत चोखामेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.विदर्भात संतांची मोठी थोर परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे विदर्भात संत साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संत विचारांचा समाज मनावर अनुकूल परिणाम होतो. बालवयातच संत विचारांच्या सानिध्यात आल्यास भावी आयुष्यात यशस्वी नागरिक घडण्यास मोलाचा हातभार लोगतो. सुदृढ सामाजिक स्वास्थ निर्माण व्हावे, जातीभेदाच्या भिंती नष्ट करून सामाजिक सलोखा वाढावा यासाठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे बडोले म्हणाले.तीन दिवस चालणाऱ्या संत साहित्य संमेलनात दिवसभर विवध कार्यक्रमांची रेलचेल राहाणार असून राज्यभरातील किर्तानकार किर्तन, भारूड सादर करतील तसेच संत साहित्यावरील गाढे अभ्यासक परिसंवादात आपली मांडणी करतील. पूर्व विदर्भातील प्रसिध्द झाडीपट्टी रंग भूमी संतावरील नाट्य संपदा सादर करणार आहे. सदर कार्यक्रमात दररोज विविध विभागाचे मंत्री, खासदार, आमदार आवर्जून उपस्थित राहाणार आहेत असेही बडोले यांनी सांगितले.