श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत आघाडीचे चतुरस्त्र गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे निर्मात्यांनी नुकतेच प्रदर्शित केले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. हे गाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
“हलके अन हळुवारसा..हो मुका अन अलवारसा...अधिऱ्या अधिऱ्या ह्या अंगणी, अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी....मोगरा फुलला, मोगरा फुलला...” या बोलाचे हे शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी अगदी तरलेने गायले आहे. हे गीत आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी ऐकले आहे, त्यांनी त्याला पसंती दिली आहे. ते लवकरच मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्वप्नील जोशी, त्याची आई नीना कुलकर्णी, सई देवधर आणि इतर कलाकारांवर चित्रीत झालेले हे गाणे जणू चित्रपटाच्या कथेचे सार सांगून जाते. मनाच्या विविध स्थिती अधोरेखित करताना, चित्रपटाचा नायक आणि यातील इतर पात्रांची नेमकी स्थिती या गाण्यातून समोर येते. विविध मानवी भावभावनांचा हिंदोळा या कथेतून हळुवार हाताळला गेला आहे, याची एक पुसटशी कल्पना या गीतातून येते. पद्मश्री विजेते शंकर महादेवन हे नाव मराठी संगीत आणि चित्रपटसृष्टीला नवीन नाही. ‘कट्यार काळजात घुसली’मधील अभिनयातून तर ते मराठी घराघरात पोहोचले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठीमध्ये अनेक गाणीही गायली आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’मधील गाण्यांबरोबरच त्यांचे माझ्या मना... (लग्न पाहावे करून), मन उधाण वाऱ्याचे... (अगं बाई अरेच्चा) ही गाणी मराठी रसिकांच्या ओठावर रेंगाळत असतात. “मराठी चित्रपटसृष्टी प्रत्येकबाबतीत प्रगल्भ आहे. मराठीमध्ये गायला मला नेहमीच आवडते. ‘मोगरा फुलला’मधील अनुभवही अगदी वेगळा होता कारण गाण्याचे बोल आणि त्यांना दिलेली चाल अगदी मधुर अशीच आहे,” महादेवन म्हणतात.
'मोगरा फुलला'मधील गाण्याच्या अनुभवाबद्दल रोहित राऊत सांगतो की, “मोगरा फुलला’सारख्या सुंदर कथेच्या सिनेमासाठी काम करायला मिळणं हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचेदेखील मला खूप सहकार्य लाभले, कारण मला असं वाटत की, एखाद गाणं संगीतकाराला सुचण्याआधी ते गाणं कोणत्या परिस्थितीला हवंय हे त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुचतं. चित्रपटातीलशीर्षकगीत पूर्णपणे मधुर, श्रवणीय आहे आणि ते प्रेक्षकांना प्रसन्न अनुभव देऊन जाईल.”